Published On : Mon, Aug 5th, 2019

‘स्वच्छता रथ’ करणार शहरात जनजागृती

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दाखविली हिरवी झेंडी

नागपूर : शहरातील प्रत्येक भागामध्ये नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण व्हावी, त्यांच्याकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जावे याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता रथ’ तयार करण्यात आले आहे. सोमवारी (ता.५) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी ‘स्वच्छता रथा’ला हिरवी झेंडी दाखविली.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत परिसरात आयोजित कार्यक्रमात स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह नगरसेवक रमेश पुणेकर, नगरसेवक नितीन साठवणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, जनजागृती रथ निर्मिती करणा-या साई सेल्सचे इकबाल सिंग, मनमोहन सिंग, नंदकिशोर शेंडे, गजानन जाधव, नितेश मेश्राम आदी उपस्थित होते.

शहरातील घरे, हॉटेल्स, दवाखाने यामधून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. मात्र या कच-याचे ओल्या व सुक्या कच-यामध्ये व्यवस्थितरित्या वर्गीकरण केले जात नाही. ओल्या व सुक्या कच-याचे योग्य वर्गीकरण व्हावे.‌ घनकच-याची योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी मनपाच्या वतीने दररोज प्रत्येक वस्त्यांमधून स्वच्छता कर्मचा-यांकडून कचरा संकलीत केला जातो.

मात्र या कच-याचे नागरिकांकडून ओला व सुका असे वर्गीकरण करण्यात येत नाही. तसेच शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छतेबाबतचे नियमही पाळले जात नाही. याबाबत शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मनपातर्फे ‘स्वच्छता रथ’च्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे. ‘स्वच्छता रथ’द्वारे स्वच्छतेबाबत घ्यावयाची काळजी, घनकच-याची योग्य विल्हेवाट, कच-याचे योग्य संकलन, शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छतेबाबतचे नियम न पाळल्यास आकारावयाचा दंड याबाबत जनजागृती केली जात आहे. याशिवाय ध्वनीफितद्वारे जनजागृती संदेश देण्यात येत आहे.

मान्यवरांनी सोमवारी (ता.५) पाच ‘स्वच्छता रथांना’ हिरवी झेंडी दाखविली. शहरातील सर्वच भागात मुख्यत: दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये, व्यापारी भाग, दवाखाने, हॉटेल्स असलेले भाग येथे रथ पोहोचवून जास्तीत जास्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले.