Published On : Thu, Oct 17th, 2019

पोर्णिमा दिवसाच्या निमित्ताने अशोक चौकात जनजागृती

Advertisement

अनावश्यक वीज दिवे बंद करून वीज बचतीचे आवाहन : मनपा-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम

नागपूर: पोर्णिमेच्या उजेड्या रात्री चंद्राचा प्रकाश असतो. त्यामुळे या प्रकाशात फारशा वीज दिव्यांची गरज नाही. किमान अशा उजेड्या रात्री अनावश्यक वीज दिवे बंद करा. वीज बचतीच्या महाअभियानात सहभागी व्हा, असे आवाहन करीत मनपा अधिकारी-कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी ग्रेट नाग रोडवरील अशोक चौकात जनजागृती केली.

नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक पोर्णिमेला पोर्णिमा दिवस उपक्रम राबविण्यात येतो. यानिमित्ताने नागपूरकरांना रात्री ८ ते ९ या वेळेत घरातील व दुकानातील अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. मंगळवारी (ता. १५) ग्रेट नाग रोडवरील अशोक चौकात जनजागृती अभियान राबविण्यात आले. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात मनपा कर्मचारी व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले. मनपा आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या या अभियानाची माहिती देत मागील काही वर्षांत यामाध्यमातून किती वीज बचत करण्यात आली, याबाबत सांगितले. यापुढेही प्रत्येक पोर्णिमेला असाच उपक्रम स्वयंस्फूर्तीने राबविण्याचे आवाहनही केले.

स्वयंसेवकांच्या आवाहनाला दाद देत व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी आपल्या प्रतिष्ठानातील, घरातील अनावश्यक वीज दिवे एक तास बंद ठेवत अभियानात सहभाग नोंदविला. मनपातर्फेही परिसरातील पथदिवे एक तासाकरिता बंद करण्यात आले होते.

यावेळी मनपाच्या विद्युत विभागाचे दिलीप वंजारी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जैस्वाल यांच्यासह मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, नम्रता जव्हेरी, दिगांबर नागपुरे, चिन्मय धिमान, शुभम येरखेडे, दादाराव माहोड यांची उपस्थित होती.