Published On : Mon, Aug 26th, 2019

स्वयंरोजगाराद्वारे पर्यावरण व आरोग्याबाबत जनजागृती

महालक्ष्मी महिला बचत गटाचा पथदर्शी उपक्रम

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाद्वारे महिला बचत गटांच्या अडचणी दूर करुन त्यांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक मदत केली जाते. मनपाच्या या योजनेचा लाभ घेत शहरातील महालक्ष्मी महिला बचत गटाने स्वयंरोजगाराच्या माध्यमातून पर्यावरण व आरोग्याबाबत जनजागृतीचे कार्य हाती घेतले आहे.

नुकतेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’मध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलची मनपा अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी पाहणी केली व उपक्रमाचे कौतुक केले.

भरभरून देणा-या निसर्गातून काही निर्माण करण्याच्या विचारातून जैविक खताची संकल्पना मांडली व त्यावर अंमलबजावणीही सुरू केली. आज महालक्ष्मी महिला बचत गटाद्वारे जैविक खत, गुलाब खत, बुरशी खत तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बचत गटातील महिलांनी या खत निर्मितीची सुरूवात आधी स्वत:च्या घरातूनच केली. तयार करण्यात आलेल्या जैविक खताचे प्रयोग घरातीलच रोपट्यांवर केले. यानंतर मिळालेल्या निकालातून मनपाच्या महिला उद्योजिकता मेळाव्याद्वारे मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली.

जमिनीमध्ये मिसळून जास्तीत जास्त गांडूळ निर्मिती करण्याचे कार्य जैविक खत तयार करते त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक काळ असतो. या खताच्या वापराचा मानवी शरीरावर कोणतेही दुष्परिणाम पडत नाही तसेच हे खत कितीही वर्षानंतर वापरत येउ शकते. शेण खत, गांडूळ खत, निम खत, कुजलेला पाला, निंबोळी, बकरी खत आदींपासून जैविक खत तयार करण्यात येते.