Published On : Sat, Feb 13th, 2021

हलजर्गीपणा टाळा, चाचणीसाठी पुढे या; नियमांचे पालन करा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आवाहन

Advertisement

नागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये मागील दोन-तीन दिवसांमध्ये वाढ झालेली आहे. यासंदर्भात प्रशासनाने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठकही घेतली आहे. यामध्ये नागरिकांनी कोव्हिड संसर्गाचा धोका टळलेला नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरत आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर, सोशल डिस्टन्स राखणे, नियमित हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येला या बाबींकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्या लक्षात घेऊन त्याचे सूक्ष्म विश्लेषण करण्यात आले आहे. शहरात खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्या नगर, न्यू बिडिपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगर आदी भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेत सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी कुठलीही लक्षणे येण्याची वाट न पाहता आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रात जाऊन मोफत चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या भागांमध्ये ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ (आरआरटी) ची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. या सर्व ठिकाणच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वात टीम नेमण्यात आली आहे. टिमद्वारे दररोजच्या अहवालाची माहिती आयुक्तांना देण्यात येणार आहे. कोरोनाबधितांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन चाचणी करण्याकरिता विशेष टिम नेमण्यात आली आहे.

मागील काही दिवसात शहरात सर्वत्र हलगर्जीपणा दिसून येत आहे. बाजारात होणारी गर्दी, मास्क लावणे, दुकानापुढे सॅनिटाजर ठेवून त्याचा वापर करूनच ग्राहकांना प्रवेश देणे आदींबाबत दुर्लक्षितता दिसून येत आहे. यासंदर्भात मनपाने कठोर पाउल उचलत मनपाचे उपद्रव शोध पथ आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे अशाप्रकारचे दुर्लक्ष करणा-यांवर ‘ऑन द स्पॉट’ कारवाई केली जात आहे.

यासंदर्भात हॉटेल व्यावसायिक संघटना, दुकानदारांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. प्रत्येकाने आपली जबाबदारी निभावने आवश्यक आहे. ते न निभावल्यास नाईलाजाने प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला.

आपल्याला काहीही होऊ शकत नाही. अशा भूमिकेतून प्रत्येकाने बाहेर पडून सुरक्षेकडे होणारा दुर्लक्ष टाळणे ही आजची सर्वात मोठी गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हाऊसिंग सोसायटीमध्ये जास्त प्रमाण
आयुक्त राधाकृष्णन बी म्हणाले, प्रत्येक हाऊसिंग सोसायटीला आवाहन करण्यात आले आहे. सोसायटीमधील एखादी व्यक्ती जरी पॉझिटिव्ह आल्यास सोसायटीमधील प्रत्येक व्यक्तीने कोव्हिड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. ते न केल्यास नाईलाजाने त्यांना ‘आयसोलेट’ करावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वयंपुढाकाराने चाचणीसाठी पुढे यावे. कोरोनाच्या चाचणीसाठी शहरातील विविध भागांमध्ये ५० पेक्षा जास्त मोफत चाचणी केंद्र सुरू आहेत.

ज्यांचा कामानिमित्त असंख्य लोकांशी संपर्क येतो जसे, भाजीवाले, दुधवाले, दुकानदार, घरकाम करणारे यासह इतर ज्यांचा कामानिमित्त जास्तीत जास्त लोकांशी संपर्क येतो, त्यांच्याही वेळोवेळी चाचणी करण्यासंदर्भात आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरात ज्या ठिकाणी गाई-म्हशींचे गोठे आहेत. त्याठिकाणीही मनपाच्या टीम भेट देणार आहेत. नागरिकांनी मनपाकडून येणाऱ्या पथकाशी संवाद साधण्यात कुठलीही टाळाटाळ करू नये. शहरातील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी व आपण बाधित होऊ नये यासाठी मनपाचे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांना सहकार्य करा, असेही आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

पुढील १० दिवसांचा ‘वर्क प्लान’ तातडीने सादर करा

मनपा आयुक्तांची व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा
शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील व्यापारी प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलाविली. शहरातील व्यापारी भागांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता सर्व व्यापारी प्रतिनिधींनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. दुकानामध्ये गर्दी होणार नाही यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. दुकानामध्ये ५ पेक्षा जास्त नागरिक दिसून आल्यास मनपातर्फे करण्यात येणारी दंडात्मक कारवाई सुरू करण्याचे उपद्रव शोध पथकाला निर्देश देण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक आदींनी त्यांच्याकडील कर्मचा-यांची महिन्यातून एकदा नियमित कोरोना चाचणी करावी. यासाठी मनपाच्या चाचणी केंद्रांमध्ये नि:शुल्क चाचणीची व्यवस्था असून त्याचा लाभ घ्यावा, असेही आयुक्तांनी आवाहन केले.

सुरूवातीला दुकानांमध्ये प्रवेश करताना ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंग केली जायची, सॅनिटायजर दिले जायचे. आज मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. सर्व व्यापारी प्रतिनिधींनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी आज कठोर होणे आवश्यक त्यादृष्टीने प्रत्येकाने नियमांचे पालन होईल, यादृष्टीने दुकान व प्रतिष्ठानांसंदर्भात पुढील १० दिवसांचा ‘वर्क प्लान’ तातडीने मनपाकडे सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

मनपा आयुक्तांशी झालेल्या चर्चेमध्ये अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, राजेश भगत, रवींद्र भेलावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव मदन केदार, नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव रामऔतार तोतला, सहसचिव स्वप्नील अहिरकर, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक, स्टेनलेस स्टील बर्तन बाजार संघटनेचे अध्यक्ष रामकिशोर काबरा, मनोज लटुरिया आदी उपस्थित होते.