| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 6th, 2020

  मृताचा कोरोना अहवाल येईपर्यंत संपर्क टाळा

  मनपा चे आवाहन : पार्वतीनगर (रामेश्वरी) येथील युवकाच्या मृत्यूने वाढला संसर्गाचा धोका

  नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नागपूरमध्ये नुकतेच एका युवकाचा मृत्यू झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) आकस्मीक विभागात भरती करण्यात आले होते. त्याचा कोरोना ‘स्वॅब’ अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, त्याच्या मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल आल्याने त्या युवकाच्या संपर्कात आलेले किंवा घरी जमलेल्या नागरिकांना कोरोनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी. कुणीही मृत व्यक्तीच्या घरी किंवा अन्य ठिकाणी संपर्क साधू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

  शहरातील पार्वतीनगर, रामेश्वरी परिसरातील एका युवकाचा दि.०५/०५/२०२० मंगळवारी मृत्यू झाला. बुधवारी (ता.६) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (मेडिकल) मधून या मृत तरुणाचा कोरोना ‘स्वॅब’चा अहवाल प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर कोविड-१९ संदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाच्या मृत्यूनंतर घरी येणा-या नागरिकांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  कोरोनाग्रस्त मृतदेहापासून होणारा संसर्ग टाळणे अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यासाठी कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल येईपर्यंत मृताशी संबंधित कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळावा. अहवाल निगेटिव्ह आल्यास मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत नियमांचे पालन करण्यात यावे. यासाठी अंत्यविधीला कमीत-कमी लोक उपस्थित राहणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी नियमांचे पालन केले जाणे आवश्यक आहे, असेही आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

  मृताचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येईल. यासंबंधी यापूर्वीच मनपा आयुक्तांनी कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मार्गदर्शक तत्वांबाबत आदेश जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार मृतदेहाला कुणीही स्पर्श करू नये. मृतदेहावर अंत्यविधी करताना पाच पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये. वरील दोन्ही नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.

  शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वयंसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत काटेकोर कार्यवाही करिता आयुक्तांतर्फे सर्व झोनचे सहाययक आयुक्त, मनपा आरोग्य विभाग तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145