Published On : Sat, Nov 2nd, 2019

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, बळीराजावर दुःखाचे सावट

कामठी : कामठी तालुक्यात सोयाबीन व धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यातच यंदाच्या खरीप हंगामात धानपिक चांगले आले होते मात्र नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे .या पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या पावसाने सनासुदीच्या दिवसात बळीराजावर दुःखाचे सावट ओढवले आहे.यामुळे तोंडी आलेला घास हरविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.झालेल्या धानपिकाची पाहणी करून त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला दोन नक्षत्र कोरडे पडल्याने शेतकरी आधीच अडचणीत आले होते मात्र त्यानंतर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.परंतु शेतकऱ्यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळले परिणामी यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन चांगले आले परंतु 26 ऑक्टोबर ला झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातल्याने शेतात उभे असलेले धानपीक जमिनीवर कोलमडून पडले आहे

काही शेतकऱ्यांच्या बांध्यात पाणी साचल्याने पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यातच अल्पमुदतीचा धान कापणी झाल्याने कडपा पावसात भिजल्याने हाती येणारे पिक गेले तर उभे असलेल्या पिकावर मावा,तुडतुडा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.तर आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करीत तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनि केले आहे.

संदीप कांबळे कामठी