झोन सभापतींच्या पतीचा ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘काम झाले हिशेब कधी करतो’

Advertisement

भाजपमध्ये खळबळ

नागपूर : शिवसेना शहरप्रमुखाच्या ऑडिओ क्लिपची शाई वाळत नाही तोच नेहरूनगर झोन सभापती सविता चकोले यांचे पती राजेंद्र चकोले यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. एका कंत्राटदाराला ‘काम झाले हिशेब कधी करतो’, अशी विचारणा राजेंद्र चकोले यांनी केली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

नेहरूनगर झोन सभापती व प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपच्या नगरसेविका समिता चकोले यांचे पती राजेंद्र चकोले हे कंत्राटदार निलकंठ बेलखोडे यांना कमिशन मागत असल्याचे संवादातून स्पष्ट होते.

मात्र, चकोले यांनी संबंधित ऑडिओमधील आवाज आपला नसल्याचा दावा करीत मोबाईल ठेवून दिला तर कंत्राटदार बेलखोडे यांनी क्लिपमधील संभाषण खरे असल्याचा दावा करीत चकोले यांनी मोबाईल करून विकासकामांचे कमीशन मागतिले व धमकावलेही, असा आरोप केला.

बेलखोडे म्हणाले, शेषनगर येथे एका सिमेंट रोडचे काम केले आहे. त्याचे बिल अद्याप मिळालेले नाही. चकोले हे त्या कामाचे कमीशन मागत आहे. बिल मिळवून देण्याची जबाबदारी नसल्याचे सांगत आहे, असे बेलखोडे यांनी सांगितले. यानिमित्त महापालिकेत नागरसेविकाऐवजी त्यांच्या पतीचीच लुडबुड अधिक असल्याचेही अधोरेखित झाले.