Published On : Sat, Oct 31st, 2020

महावितरणमधील विद्युत सहायक पदाच्या नियुक्त्या बावनकुळेंचे आंदोलन

Advertisement

नागपूर: महावितरणमधील पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक आणि 412 शाखा अभियंत्यांता पदाच्या परीक्षा होऊन आणि अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही निवड यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे.

या सर्व पदांच्या नियुक्तांबद्दल येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत महावितरणने निर्णय घ्यावा अन्यथा येत्या 2 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. ते आंदोलन काही अपरिहार्य कारणामुळे 3 नोव्हेंबरला होईल, असे बावनकुळे यांनी कळविले आहे.

महावितरण नागपूरच्या प्रादेशिक संचालक कार्यालयासमोर 15 ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता. पण महावितरणने या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे व आंदोलन तूर्तास मागे घेण्याची विनंती केली होती.

आता 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता संविधान चौकात आंदोलन करण्यात येईल असे बावनकुळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे व ऊर्जामंत्र्यांना कळविले आहे. मुख्यमंत्र्यांना बावनकुळे यांनी दोनदा निवेदन दिले आहे.