नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनसमोर मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एका टपरीधारकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, तात्काळ प्रसंगावधान राखत पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले.
महानगरपालिकेचे पथक रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत चहा व पान टपऱ्या हटवण्याची कारवाई करत होते. याचवेळी संतप्त टपरीधारकाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या ठिकाणी उपस्थित पोलिस कर्मचारी पंकज रामटेके यांनी धाडस दाखवत त्या व्यक्तीला थांबवले आणि गंभीर घटना घडण्यापासून रोखले.
या प्रसंगामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि संबंधित इसमाला पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेनंतर एनएमसी आयुक्तांनी पोलिस कर्मचारी पंकज रामटेके यांच्या तात्काळ व शौर्यपूर्ण कृतीचे कौतुक केले. तसेच अशा कारवायांदरम्यान भविष्यात कुठलेही अनिष्ट प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासन व पोलिस अधिक सतर्क राहतील, असेही आश्वासन देण्यात आले.