नागपूर: लवकरच सर्वत्र श्री गणरायाचे आगमन होणार असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी(ता.१९) महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा घेतला.
याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री तुषार बारहाते, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त श्री. अशोक गराटे, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहाय्यक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, सर्वश्री प्रमोद वानखेडे, विकास रायबोले, हरीश राऊत, सतीश चौधरी, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवार, श्रीमती अल्पना पाटणे, श्री. रवींद्र बुंधाडे, श्री. विजय गुरुबक्षानी, श्री. सुनील उईके यांच्यासह सर्व झोनचे कार्यकारी अभियंता माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्निल लोखंडे, यांच्यासह सर्व झोनचे अधिकारी उपस्थित होते.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी श्रीगणेश उत्सवासह गणेश मूर्ती विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेतला तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्काळ मंजुरी देण्यात याव्या, असेही निर्देश यावेळी दिले.
श्रीगणेशाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेने यावर्षीही शहरात विविध ठिकाणी कृत्रिम टँक तयार करणार आहे. याशिवाय मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी व कोराडी येथे वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जनाची मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी व चोख व्यवस्था ठेवावी, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात २०८ ठिकाणी ४१५ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय चार फुटापेक्षा मोठ्यामूर्तीच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीसलाईन टाकळी व कोराडी याठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आहे. कृत्रिम तलावांमध्ये पाणी भरण्यासाठी अतिरिक्त टँकरची व्यवस्था करण्यात यावी, तसेच विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात यावे, मिरवणुकीच्या मार्गावरील झाडांच्या फांद्या कापण्यात याव्या, तसेच विसर्जनाच्या मार्गावर खड्डे राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले.
प्रत्येक झोनमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या परवानगीसाठी येणाऱ्या व्यक्तींना संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळावी, याकरिता एक खिडकी व्यवस्थेत योग्यपद्धतीची सोय करावी. पोलीस व अग्निशमन दलाचा जवान सुद्धा तेथे उपस्थित राहावे, जेने करून परवानगी मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. याची दक्षता घ्यावी.
फिरते विसर्जन कुंड
अनेक ज्येष्ठ नागरिकांना श्रीगणेशाचे विसर्जन करण्यासाठी दूर जाता येत नाही. त्यांच्या सोयीसाठी मोबाईल विसर्जन तलावाची अर्थात फिरते विसर्जन कुंडाची व्यवस्था यावेळी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तींने झोनमध्ये नोंद केल्यास त्यांच्या घरासमोर मोबाईल विसर्जन टँक येईल. निर्माल्य जमा करण्यासाठी १४ निर्माल्य रथ शहरात राहणार आहे. नैसर्गिक जलस्त्रोमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन होणार नाही.
याशिवाय विसर्जनाच्या ठिकाणी करावयाची व्यवस्था करण्यात यावी कृत्रिम तलाव, विद्युत प्रकाश व्यवस्था, निर्माल्य जमा करण्यासाठी कलश., वैद्यकीय सुविधा, अग्निशमन सुरक्षा आदी व्यवस्था चोख ठेवण्याचेही निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले.