
नागपूर : अमरावती रोडवरील हावे गोलोरी हॉटेलसमोर मध्यरात्री सुरू असलेल्या पोलिस नाकाबंदीवेळी भरधाव आयशर वाहनाने अक्षरशः थरार निर्माण केला. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने पोलिसांचा इशारा धुडकावून लावत थेट बॅरिकेडला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कॉन्स्टेबल संतोष गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उजव्या पायाला आणि खांद्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अमरावती रोडवरील हावे गोलोरी हॉटेलसमोर वाहतूक एमआयडीसी पोलिसांकडून विशेष नाकाबंदी सुरू होती. पीएसआय रतन उंबरकर, हेड कॉन्स्टेबल नारायण चौधरी, प्रफुल, कॉन्स्टेबल सुजित, प्रतीक आणि संतोष हे वाहनांची तपासणी करत होते.
याचवेळी वाडी नाक्याकडून भरधाव वेगाने येणारी आयशर गाडी (MH 32 AJ 3060) पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने वेग कमी करण्याऐवजी थेट बॅरिकेडवर गाडी घातली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की बॅरिकेड हवेत उडाले आणि कॉन्स्टेबल संतोष गंभीर जखमी झाले.
धडक दिल्यानंतरही चालकाने वाहन न थांबवता जवळपास एक किलोमीटरपर्यंत भरधाव गाडी पळवली. मात्र पीएसआय रतन उंबरकर आणि त्यांच्या पथकाने तत्काळ पाठलाग करून आरोपी चालकाला ताब्यात घेतले. या पाठलागादरम्यान पीएसआय उंबरकर यांच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली.
जखमी कॉन्स्टेबल संतोष यांच्यावर आर्यन सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी ट्रॅफिक विभागाचे एपीआय धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दारूच्या नशेत बेफाम वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर रात्रीच्या नाकाबंदीवेळी पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.








