Published On : Sun, Oct 11th, 2020

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची साकोली रुग्णालयाला भेट

भंडारा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली येथील रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा पुरवाव्या अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या भेटीत नाना पटोले यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केली व रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेवर लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शासकीय रुग्णालयात गरीब व गरजू लोक येतात या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. कारण नसतांना रुग्णाला रेफर (संदर्भित) करू नये अशा सक्त सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला व विचारपूस केली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण त्रास होता काम नये असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा इलाज झाला पाहिजे. रुग्णालयात येताना भीती नाही तर आपण बरे होणार असा विश्वास वाटला पाहिजे असे वातावरण निर्माण करा, असे ते म्हणाले.

कोरोना विषयी लोकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम तालुक्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.