Published On : Thu, Jul 5th, 2018

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; सिडको भूखंड घोटाळ्यावरुन विरोधक आक्रमक

नागपूर: सिडको भूखंड घोटाळ्यावरुन आज विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच गुरुवारी विरोधी पक्षांनी सिडको भूखंड घोटाळ्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार वर्षात क्लिन चिट देण्याचा धडाका लावला. मात्र, सिडकोत मुख्यमंत्रीच संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे ते याप्रकरणात स्वतःच चौकशीची घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. आता ते स्वतःलाच क्लिन चिट देतील असे वाटते, असे चिमटाही त्यांनी काढला. संघटीत कट रचून हा गुन्हा करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सिडकोतील भूखंड घोटाळा गंभीर असून यासंदर्भात चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी लावून धरली.