नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी १३ दिवसांच्या प्रचारानंतर आज, सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वीचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. निवडणूक विभाग, पोलिस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथके अधिक सक्रिय राहणार आहेत.
उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालीवरही त्यांची नजर राहणार आहे. महायुती, महाविकास आघाडी, मनसे, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा शेवटच्या रविवारच्या दिवशी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रचार केला. नागपूर शहरासह जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे.
निवडणुकीदरम्यानचा शेवटच्या रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधून उमेदवारांसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला. त्यामुळे रविवारचा दिवस हा प्रचारासाठी महत्त्वाचा ठरला.