Published On : Fri, Dec 29th, 2017

कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई कराः खा. अशोक चव्हाण

Ashok Chavan
मुंबई: कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात विविध दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. घटना घडल्यावर सरकार फक्त चौकशीचे आदेश देते, पंरतु ठोस कारवाई होत नाही. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत. कमला मिल कंपाऊंडमध्ये गेल्या काही दिवसांत फार मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि क्लब सुरु झाले आहेत.

त्यातल्या अनेक क्लबमध्ये अनधिकृत बांधकामे असून अनेकांना अग्निशमन विभागाच्या परवानग्या नसल्याचे किंवा नियम डावलून परवानग्या दिल्याची माहिती मिळते आहे. ही अतिशय गंभीर बाब असून महापालिका अधिका-यांच्या वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार असणा-या अधिका-यांवरही कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

महापालिका अधिकारी आणि हॉटेल व क्लब चालकांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबई आणि परिसरात मृत्यूचा खेळ सुरु आहे. अशा घटनांसाठी जबाबदार असणा-यांना कडक शासन झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.