पंढरपूर : आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह वारकऱ्यांचे जत्थे पंढरीत पोहोचत आहेत. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण पंढरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदाच्या आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चंद्रभागा नदीच्या पूर्व काठावरील तब्बल ६५ एकर परिसर वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी विकसित करण्यात आला असून येथे सुमारे ५ लाख वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी या ठिकाणाहून चंद्रभागा नदीत स्नानासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना सुमारे एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पाहणी करून अल्पावधीतच नवा रस्ता आणि घाटाची निर्मिती केली.
या नव्या घाटामुळे वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणावरून थेट चंद्रभागा नदीपर्यंत सहज पोहोचता येणार असून स्नानासाठी लागणारा वेळ आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.





