Published On : Wed, Jul 1st, 2020

Ashadhi Ekadashi | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा

Advertisement

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे तीन वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. (Pandharpur Ashadhi Ekadashi CM Uddhav Thackeray Rashmi Thackeray performs Vitthal Rakhumai Mahapooja)

“राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो आहे. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचे बळ द्या” अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठू माऊलींच्या चरणी केली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर मंदिराचा गाभारा सुगंधी फुलांनी सजवण्यात आला आहे.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही महापूजेला उपस्थित होते. “पंढरपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आई, यांच्यासोबत विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन घेतले. यावेळी फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाला कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर मुक्त कर असे साकडे मी विठुरायाच्या चरणी घातले.” असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन सांगितलं.

त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंग चरणी वंदन केलं. राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, कोरोनायोद्ध्यांचे संरक्षण कर आणि बळीराजाच्या घरात समृद्धी नांदू दे, असं साकडंही त्यांनी घातलं.

महापूजेआधी उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार, त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल, असे सांगत त्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पंढरपुरात येऊ नये, घरातूनच विठ्ठलाचे नामस्मरण आणि पूजा करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

गजबजणारी पंढरी सुनीसुनी

यंदाच्या आषाढी एकादशीवर कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. एरवी लाखो वैष्णवांच्या गर्दीने गजबजलेली पंढरी आज सुनीसुनी दिसली. मंदिर परिसर आणि शहरातही शुकशुकाट होता. चंद्रभागेच्या पवित्र काठी नीरव शांतता होती. मंदिर परिसर आणि शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. एरवी लाखोंच्या संख्येने गजबजलेल्या पंढरीला आज पोलीस छावणीचे स्वरुप आले. शहरात द्वादशीपर्यंत संचारबंदी राहणार आहे.

पालख्या पंढरीत कशा पोहोचल्या?

मानाच्या संतांच्या पादुका मंगळवारी (काल) संध्याकाळी कोरोना नियमांच्या अधीन राहून वाखरी येथे पोहोचल्या. या पादुका अवघ्या 20 भाविकांसह एसटी बसेसमधून आणल्या गेल्या. वाखरी येथे शासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर या पालख्यांच्या भेटीला पंढरपुरातून संत नामदेवरायांच्या पादुका सजवलेल्या बसमधून पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत गेल्या आणि सर्व मानाच्या पालख्यांचे बसमधूनच पंढरपुरात आगमन झाले.

Advertisement
Advertisement