
नागपूर, प्रतिनिधी: नागपूर शहरातील कॉटन मार्केट वाहतूक परिमंडळाच्या हद्दीत महत्त्वाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. हत्तीनाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम मे. सुविचार कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येणार असून, हे काम येत्या ५ ऑगस्टपासून २० ऑगस्ट २०२५ पर्यंत १५ दिवस चालणार आहे.
या काळात महाल झेंडा चौकातून गंगाबाई घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सदर मार्गावर नेहमीच प्रचंड प्रमाणात वाहने चालत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.
पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे-
झेंडा चौकातून गंगाबाई घाटाकडे जाणारी वाहने-
माणिकपुरा चौक → लाकडीपुल बस स्टॉप → गंगाबाई घाट
गंगाबाई घाट येथून झेंडा चौकाकडे येणारी वाहने-
मंगळवारी → आदमशाह चौक → झेंडा चौक
या अधिसूचनेचा ५ ऑगस्टपासून २० ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रभाव राहणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त लोहित मतानी यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि वाहतुकीत होणारी अडथळे टाळावेत.
नागपूरच्या नागरिकांनी याकडे केवळ बंदी म्हणून न पाहता, आपल्या सहकार्यामुळे एक महत्त्वाचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल याची जाणीव ठेवावी.