नागपूर, : नागपूर महानगरपालिका (NMC) आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांनी शहरातील पाण्याच्या चोरीला आणि अनधिकृत नळजोडणांना आळा घालण्यासाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे. ३१ जुलै २०२५ पर्यंत शहरभर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सुमारे ५,००० अनधिकृत नळजोडणांचे डिस्कनेक्शन करण्यात आले आहे.
मनपा व OCW यांच्या संयुक्त कारवाईस नागपूर पोलिसांचे सहकार्य लाभले असून, ही कारवाई शहरातील सर्व १० झोनमध्ये करण्यात आली. सर्वाधिक कारवाई आशीनगर-A (झोन 9-A) येथे झाली असून, तेथे १,००३ अनधिकृत जोडण्या तोडण्यात आल्या. त्यानंतर धंतोली (४७०) आणि नेहरू नगर (३८८) या झोनमध्येही लक्षणीय कारवाई झाली. अनधिकृत वापराच्या प्रकारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
• मीटरपूर्वी टॅपिंग (TBM): ३६२
• अनधिकृत नळजोडण्या (IL): २,५६६
• तोडलेली नळजोडणी पुन्हा जोडलेली (ILRC): २०४
• डबल नळजोडण्या: १,६४२
पार्डी-१ कमांड एरियामध्ये OCW च्या पथकाला एका एकाच खड्ड्यामध्ये ७ अनधिकृत टॅपिंग्स आढळून आल्या, ज्यावरून शहरात अनधिकृत वापर किती मोठ्या प्रमाणात आहे, याचा अंदाज येतो. अशा वापरामुळे पाण्याच्या गुणवत्तेवरही मोठा परिणाम होऊ शकतो.
ही व्यापक कारवाई NMC व OCW च्या पिण्याचे पाणी सर्व नागरिकांना समप्रमाणात, सुरक्षित व दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. अनधिकृत नळजोडण्या केवळ महसुली नुकसानच करत नाहीत, तर बॅक-सायफनेज व असुरक्षित टॅपिंगमुळे गंभीर आरोग्यविषयक धोकेही निर्माण करतात.
NMC व OCW नागरीकांना आवाहन करतात की त्यांनी त्यांच्या नळजोडण्या तात्काळ नियमित कराव्यात व शहरात स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात सहकार्य करावे. अनधिकृत नळजोडणी आढळल्यास नागरिकांनी ती OCW च्या हेल्पलाइनवर किंवा संबंधित झोन कार्यालयात जाऊन गोपनीयरीत्या कळवावी.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.