
नाशिक : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले असून, यापूर्वी जिल्हा न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही संकटात सापडली आहेत.
मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका वाटपात अनियमितता केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर आहे. या प्रकरणात तक्रारदार अंजली दिघोळे यांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अटक वॉरंटसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने कोकाटे यांना हजर राहण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही ते गैरहजर राहिले. आज दिवसभर ते संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली होती. नंतर त्यांच्या रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. निफाड मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले कोकाटे यांना नुकतेच पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले होते. मात्र, जुन्या सदनिका घोटाळ्याचे प्रकरण आता त्यांच्या राजकीय भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पवार गटात संभाव्य खातेबदलावरही चर्चा सुरू असून, कोकाटे यांची अटक कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडींमुळे महायुती सरकारला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, कोकाटे यांच्या अटकेनंतर मंत्रिमंडळ पुनर्रचनेची शक्यता अधिक बळावली आहे. सदनिका घोटाळ्याचे प्रकरण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने पुढील काळात आणखी महत्त्वाची तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणावर कोकाटे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.








