Published On : Wed, May 6th, 2020

लॉकडाऊनचा काळात ‘मनरेगा’चा ग्रामीण भागातील लाखोंना रोजगार

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतांनाच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील 3 लाख 81 हजार 930 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. त्यामुळे कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नसल्याची माहिती राज्याचे मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी आज दिली.

लॉकडाऊनमुळे उद्योग व व्यापारावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच शेतकरी व शेतमजूर यांच्यासोबत उपजिवीकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या घटकांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहीक स्वरुपाच्या एकूण 35 हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यामुळे प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध झाली आहे. या कामांवर 14 लाख मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाली आहे. राष्ट्रीय पातळीपेक्षा राज्यात 4.2 टक्के एवढी जास्त कामे सुरु झाली आहे.

मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात आली. दिनांक 4 एप्रिल रोजी राज्यात 19 हजार 509 मजूर विविध कामांवर होते. परंतु एक महिन्यानंतर म्हणजेच 4 मे रोजी 3 लाख 81 हजार 930 मजूर राज्याचा विविध भागात वैयक्तिक तसेच सामूहीक स्वरुपाच्या 43 हजार 292 कामांवर उपस्थित आहे. मजूरांची ही संख्या सातत्याने वाढत असून प्रत्येक तालुकास्तरावर मागणी नुसार कामांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात 7 हजार विविध प्रकारचे कामे पूर्ण झाली असून कामावर असलेल्या प्रत्येकाला 15 दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत मजुरीपोटी 40 कोटी रुपयाचे वाटप पूर्ण झाले आहे. राज्यातील सरासरी 96 टक्के मजुरांना वेळेवर मजुरीची रक्कम दिली आहे. तसेच इतर कामांवर 78 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए.एस.आर.नायक यांनी दिली.