Published On : Fri, Jun 8th, 2018

अन्न नाल्यांमध्ये टाकणाऱ्या हॉटेलचे सर्वेक्षण करा : मनोज चापले

Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील अनेक हॉटेलमधून अन्न नाल्यांमध्ये फेकले जाते. हॉटेलमधून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी आणि ते ड्रेनेजला जोडण्यासाठी मनपाकडून परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी लोककर्म विभागाकडून दिल्या जाते. लोककर्म विभागाकडे परवानगीसाठी अर्ज आल्यास त्यांनी आरोग्य विभागाला त्याची माहिती द्यायला हवी. मात्र, तसे होत नाही. यापुढे आरोग्य विभागाला त्याची माहिती देण्यात यावी आणि कुजलेले शिळे अन्न नाल्यांमध्ये टाकणाऱ्या हॉटेलवर कार्यवाही करण्यासाठी तातडीने एक सर्वेक्षण करा, असे निर्देश आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित आरोग्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपसभापती विजय चुटेले, सदस्य प्रमोद कौरती, लखन येरवार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (मे.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, परिवहन नियंत्रक योगेश लुंगे उपस्थित होते.

सदर बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सभापती मनोज चापले यांनी केले. हॉटेलचे अन्न नाल्यांत टाकल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. साथीचे रोग वाढू शकतात. यासाठी आता त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. यासाठी तातडीने सर्वेक्षण करा आणि अशा हॉटेलमालकांना नोटीस देण्याची कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले. यानंतर सभापती चापले यांनी नाले सफाईचा झोननिहाय आढावा घेतला. चेंबर सफाईचे काम तातडीने पूर्ण करा. झोनमध्ये ज्या चेंबरवर झाकणाची आवश्यकता आहे त्याची तातडीने यादी बनवून शनिवारी सायंकाळपर्यंत मुख्यालयाला पाठवा आणि दोन दिवसांत त्यावर झाकणे लावा, असे निर्देशही त्यांनी दिले. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढू शकते. त्यादृष्टीने सुरू असलेल्या उपक्रम आणि उपाययोजनांबाबत हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी माहिती दिली. बैठकीला सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.