Published On : Fri, Jun 8th, 2018

शासनाच्या योजना घराघरांपर्यंत पोहचविण्यासाठी कटिबद्ध : ना. सदाभाऊ खोत

नागपूर : केंद्र शासन आणि राज्य शासनाने गेल्या चार वर्षात जनसामान्यांसाठी अनेक उपयोगी योजना राबविल्या. आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या योजना लोकांपर्यंत पोहचविला. त्याचा लाभ लोकांना दिला. ह्या योजना आणि शासनाचे कार्य राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यादृष्टीने आमचे ‘समर्थनासाठी संपर्क’ अभियान सुरू असल्याचे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

खरीप हंगाम आढावा बैठकीच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या ना. सदाभाऊ खोत यांनी नागपूर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली आणि पदाधिकारी तसेच भाजप नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, विदर्भ प्रांतचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूर महानगर संघटन मंत्री भोजराज डुंबे, नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प. चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, संदीप जाधव उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. सदाभाऊ खोत म्हणाले, सरकारमध्ये काम करीत असताना मागील चार वर्षात जी-जी कामे केली ती घराघरांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या एकूण २७ विकासात्मक योजनांचा आपण चार्ट तयार केला. ह्या योजना गावागावांत राबविण्याचा संकल्प केला. कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून एकाच तालुक्यातून १६ हजार अर्ज आले. त्यांना या योजनांचा लाभ देऊ शकलो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ओरडणाऱ्यांना आपण जाब दिला. त्यांना शांत बसावे लागले. ज्यांचा शेतमाल मंडीमध्ये येतो त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो अधिकार आता त्यांना मिळाला आहे.

अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. मुख्यमंत्री आरोग्य निधीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोठा लाभ झाला. आपण स्वत: आजपर्यंत सुमारे सात कोटींची मदत मुख्यमंत्री आरोग्य निधीच्या माध्यमातून रुग्णांना मिळवून दिली. माझ्या बंगल्यातील ५० टक्के जागा रुग्णसेवेसाठी राखीव असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्ररोग निदान शिबिराच्या माध्यमातून १६ हजार रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले. साडे चार हजार लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. भाजपकडून समाजापर्यंत कसे पोहोचायचे याचे ज्ञान मिळाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

महापौरांनी केला सत्कार

यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा शाल, श्रीफळ आणि तुळशीचे रोपटे देऊन महापौर नंदा जिचकार यांनी सत्कार केला. आमदार सुधाकर कोहळे यांनीही त्यांचे स्वागत केले. आम्ही सुद्धा संपर्क अभियानाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आपणही संपर्क अभियानाच्या निमित्ताने फिरत आहात. त्यामुळे संपर्काचा एक चांगला योग जुळून आल्याचे महापौर नंदा जिचकार आणि आमदार सुधाकर देशमुख यांनी म्हटले.