Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Sep 3rd, 2019

  ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’बाबत आर्कीटेक्टने प्रमाणपत्र देणे अनिवार्य करा : अभय गोटेकर

  स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या बैठकीत निर्णय

  नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मोठ्या इमारती व इतर ठिकाणी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मनपा मुख्यालयातील इमारतीमध्येही सिस्टीम लावण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील मोठ्या इमारती, सदनिकांमध्ये ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ होणे आवश्यक आहे. यासाठी बांधकाम करण्यात येणा-या इमारतीचा नकाशा मंजुर झाल्यानंतर संबंधित आर्कीटेक्टने सदर इमारतीचे नियमानुसार ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ झाले असल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य करण्यात यावे, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

  स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची विविध विषयांसंदर्भात मंगळवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर यांच्यासह सदस्या विद्या मडावी, सोनाली कडू, पल्लवी श्यामकुळे, उज्ज्वला बनकर, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, उपअभियंता श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.

  बैठकीमध्ये नकाशा मंजुर झालेल्या जुन्या बिल्डींगमधील ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ची स्थिती व पुढील बांधकामाला मंजुरी देताना ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ची अंमलबजावणी, शहरात रोड साईडला ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ची यंत्रणा उभी करण्याबाबत विचार करणे, सिमेंट रोड टप्पा १, २ व ३ ची माहिती, शहरात अनेक ठिकाणी अवैद्य पद्धतीने सुरू असलेले बाजार व त्यामार्फत नागरिकांना होणारा त्रास आणि मनपाचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, न्यू एस.टी. स्टॅण्ड शेतकरी भवन मागील सायकल स्टॅण्ड सुरू करणे, शहरात अनेक ठिकाणी अवैद्य मोबाईल टॉवर असून त्यावर करता येणारी कारवाई, जीर्ण इमारती, नगर रचना विभागामधील १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत झोननुसार मंजुर बिल्डींग बांधकाम नकाशे, मिळालेले उत्पन्न व नामंजुर बांधकाम नकाशे याची झोननिहाय स्थिती, जम्बुदीप नगर येथील नाल्याचे बांधकाम आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

  नकाशा मंजुर झालेल्या जुन्या बिल्डींगमधील ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’च्या स्थितीबाबत आवश्यक ती कार्यवाही करून पुढील बांधकामाला मंजुरी देताना नकाशा मंजुर झाल्यानंतर आर्कीटेक्टकडून इमारतीचे नियमानुसार ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय शहरात सुरू असलेल्या सिमेंट रोडच्या बांधकामात कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अनेक मार्गांचे काम थांबले असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. सिमेंट रोड बांधकामाचा दर्जा घसरू न देता काम तातडीने पूर्ण होईल, याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापतींनी यावेळी दिले.

  शहरात अनेक ठिकाणी अवैद्यरित्या बाजार भरविण्यात येतात यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा बाजारांबाबत अतिक्रमण विभागांशी समन्वय साधून यामाध्यमातून मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचेही सभापतींनी निर्दशित केले. शहरातील जम्बुदीप नगर येथील नाल्याचे बांधकाम कार्य अनेक दिवसांपासून रखडले असून यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेउन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतही निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145