Published On : Fri, Jun 1st, 2018

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अरबाज खानला पोलिसांनी पाठवले समन्स

Arbaz Khan

मुंबई: अभिनेता- निर्माता अरबाज खान याला आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने समन्स बजावले आहेत. देशात चालणाऱ्या सट्टा बाजारातील सर्वात मोठा नामचीन बुकी म्हणून ओळखला जाणारा सोनू जालनशी अरबाजचे संबंध असल्याचे पोलिसांनी याप्रकरणी सांगितले आहे.

दोन दिवसापूर्वीच ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालानला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अरबाज खानचे नाव समोर आले. यात २०१६ ला खेळल्या गेलेल्या श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना असून याआगोदर आयपीएल ११ च्या सामन्यांच्या बेटिंगसंदर्भात सोनू मालाड, प्रेम तनेजा आणि अंधेरी परिसरातील एका बुकीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे पथकाकडून अटक करण्यात आली होती. सोनू मालाड याचा सहकारी ज्युनियर कोलकाता याने २०१६ला श्रीलंका येथे जाऊन पिच क्युरेटरसोबत संगनमत करून मॅच फिक्स केली होती. या सामन्यादरम्यान एकूण २१ विकेट एका दिवसात पडले होते.

पाकिस्तान २०१६ला झालेल्या पाकिस्तानी माजी क्रिकेट खेळाडूंच्या घरगुती सामन्यातसुद्धा मॅच फिक्सिंग करण्यात आली होती. पाकिस्तानच्या एका संघाचा युके स्थित मालकाच्या संपर्कात सोनू जालान आला होता. ही भेट मुंबईतील बांद्रा परिसरातील एका चित्रपट अभिनेत्याने करवून दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार हा अभिनेता अजून दुसरा कोणीही नसून अरबाज खान असल्याचे मालाड याने चौकशीत कबुल केले आहे. आरबाज खान हा याच सोनू मालाड आणि त्याच्या अन्य सट्टा बाजारातील साथीदारांसोबत एका ठिकाणी भेटल्याचे काही छायाचित्रांवरून स्पष्ट होत आहे.

सोनू जालान हा मुंबईच्या सट्टा बाजारातील मोठा सट्टेबाज असून त्याचे परदेशात अनेक ग्राहक आहेत. यांपैकी अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि सौदी अरेबिया या ठिकाणच्या ग्राहकांशी तो संपर्कात असतो. तर भारतातही त्याची मोठी टोळी असून ते दिल्ली, कोलकाता, राजस्थान, गुजरात, हरयाणा येथून त्याचे साथीदार सट्टा खेळतात.