Published On : Thu, Oct 6th, 2022
By Nagpur Today Nagpur News

दीक्षाभूमी विकासाच्या 190 कोटींच्या आराखड्याला 15 दिवसात मान्यता – उपमुख्यमंत्री

Advertisement

धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाला भरपावसात लाखो अनुयायांचे अभिवादन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती

नागपूर : गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात लक्षावधी अनुयायांसमोर ते बोलत होते.

Gold Rate
Monday 17 March 2025
Gold 24 KT 88,000 /-
Gold 22 KT 81,800 /-
Silver / Kg 100,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऐतिहासिक दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने 66 वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा. गवई होत्या.

केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे संचालक धम्मज्योती गजभिये, स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, समितीचे सदस्य अॅड. मा.मा. येवले, अॅड. आनंद फुलझेले, एन. आर. सुटे, डॉ. राजेंद्र गवई, डी. जी. दाभाडे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, भन्ते नाग दीपांकर, डॉ. मिलिंद माने, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपाआयुक्त सिद्धार्थ गायकवाड, केंद्रीय मंत्री आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांची यावेळी उपस्थिती होती. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे प्रकृती अस्वास्थामुळे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वर्षांपूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दसरा सणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे होतो. देश-विदेशातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. यावर्षीही गेल्या तीन दिवसात जवळपास 30 लक्ष नागरिकांनी याठिकाणी अभिवादन केले. पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी केलेली गर्दी लक्षणीय होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते महापौर असतानापासून दीक्षाभूमीच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारकडून दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच्या धार्मिक स्थळाची मान्यता प्रलंबित असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामदास आठवले यांच्यासह आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षाभूमीच्या विकासासाठी यापूर्वी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी 40 कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासकडे जमा असून 60 कोटी रुपये देण्याची राज्य शासनाची तयारी होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये पाठपुराव्या अभावी दीक्षाभूमी आराखडा रखडला. आता पुढील पंधरा दिवसात सुधारित 190 कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल, तसेच केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या बाबींसाठी पाठपुरावा देखील केला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

इंदू मिल येथे उभारल्या जात असलेल्या विश्वस्तरीय 2400 कोटी किमतीच्या इंदू मिल जमिनीचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोडवल्याचा अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच 2024 मध्ये इंदू मिल येथे अद्यावत स्मारक उभे राहणार असून सी लिंक वरून जाणाऱ्या प्रत्येकाला त्याचे दर्शन घ्यावेच लागेल, अशा पद्धतीची रचना या स्मारकाची करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना ते ज्या निवासस्थानात राहत होते. त्या निवासस्थानाला स्मारकामध्ये रुपांतरण, जपानमध्ये विद्यापीठात बाबासाहेबांच्या पुतळ्याची उभारणी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. तेथील कुलगुरूंनी बाबासाहेबांचा प्रबंध आजही संदर्भासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. बाबासाहेबांचा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एक वैश्विक व्यक्तिमत्व म्हणून आदराने उल्लेख केला जातो, असे सांगितले. बाबासाहेबांनी जो धर्म स्वीकारला त्यामध्ये समतेचे बीज असून धम्माच्या आचरणाची दीक्षा आहे. उद्याचा भारत समताधिष्ठित विचारांवर निर्माण करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. बाबासाहेबांचे विचार घेऊनच उद्याचा भारत निर्माण करायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाबासाहेबांनी स्वीकारलेला धर्म अतिशय प्रभावी असून संपूर्ण दक्षिण आशिया खंडात या धर्माचे अनुयायी आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा विचार या धम्मातून व्यक्त केला गेला आहे. बाबासाहेबांनी धर्म परिवर्तनासोबतच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनाला आपल्या जीवनकार्यात महत्व दिले.
त्यामुळे त्यांची तुलना अमेरिकेत कृष्णवर्णीयांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजकारणी मार्टिन ल्युथर किंग यांच्याशी केली जाते, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. दीक्षाभूमी येथील विकासासाठी वचनबद्ध असून सर्व प्रलंबित मागण्यांना न्याय दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केंद्र शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन दिले.

बाबासाहेबांनी महिलांना जे अधिकार दिले त्याचा उपयोग समता, बंधुतावर आधारित समाज निर्मितीसाठी करावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती गवई यांनी केले. विलास गजगाटे यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement