Published On : Wed, Jun 16th, 2021

मनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा

महापौर दयाशंकर तिवारी यांचे प्रशासनाला निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध विषयांच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. असे अनेक विषय मनपा राज्य शासनाकडे पाठवित असते. मात्र या विषयांबाबत काय कार्यवाही झाली अथवा नाही याची माहिती मिळू शकत नाही. त्यामुळे मनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांच्या पाठपुराव्यासाठी एक जबाबदार अधिकारी नियुक्त करण्यात यावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.

ऐवजदार सफाई कर्मचा-यांच्या प्रलंबित विषयाच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१६) महापौर कक्षामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह आरोग्य समिती सभापती महेश महाजन, नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त राजेश भगत, नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते. धर्मपाल मेश्राम यांच्या विनंती वरुन लाड-पागे समितीशी संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

नागपूर महानगरपालिकेतर्फे लाड – पागे समितीच्या शिफारशीद्वारे सफाई कामगारांची नियुक्ती करने तसेच ऐवजदारांना स्थायी करण्यामध्ये येणा-या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पत्र पाठविण्यात आले आहे. याशिवाय डीपी रोड, आरक्षण अशा विविध विषयांच्या संदर्भात सुद्धा पत्र पाठविण्यात आले आहे. हे सगळे विषय अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. या पत्रांवर राज्य शासनाकडून काय कार्यवाही झाली याची माहिती घेउन विषयांचा पाठपुरावा करण्याबाबत जबाबदार अधिकारी नियुक्त करण्यात यावे, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठकीत सूचित केले.