नगरसेवक म्हणून केलेल्या कार्याचा जनतेपुढे ठेवला लेखाजोखा
नागपूर : मागील चार वर्षात नगरसेवक व मनपाचा विधी समिती सभापती म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेणा-या ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या ‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ या पुस्तकाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमोचन झाले.
२०१७ ते २०२० या कार्यकाळात ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नगरसेवक व विधी समिती सभापती म्हणून महानगरपालिकेमध्ये कार्य केले. आतापर्यंत केलेल्या कामाचे विवरण पक्षासमोर आणि प्रभागातील जनतेपुढे ‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ या पुस्तकाच्या माध्यमातून ठेवले आहे. त्यांच्या या पुस्तकाचे विमोचन करताना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी पत्राद्वारे त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
‘सन २०१७ ते २०२० या कालावधीमध्ये आपण आपल्या प्रभागात सुमारे २१ कोटीपेक्षा अधिक निधींची कामे केली आहेत. सभागृहात विविध विषयावर झालेल्या चर्चेतही भाग घेउन जनतेचे प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. आढावा पुस्तिकेतून आपण जनतेसमोर केलेल्या कामाचा आढावा सादर केला. हा स्तूत्य उपक्रम आहे’, असे सांगतानाच या कार्याची दखल प्रभागातील जनता निश्चितपणे घेईल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी पत्राद्वारे व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आढावा पुस्तिकेच्या विमोचन प्रसंगी ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे अभिनंदन केले. जनतेपुढे आपल्या कामाचा आढावा सादर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे स्तूत्य बाब असल्याचे सांगत त्यांनी ॲड. मेश्राम यांना शुभेच्छा दिल्या.
२०१७ ते २०२० या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न केला व पुढेही तो राहिल. जनतेच्या प्रश्नांना, त्यांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी झटताना नेहमीच पक्षश्रेष्ठींनी मार्गदर्शन केले.
विदर्भ प्रदेश भाजपाचे संघटनमंत्री डॅा. उपेंद्रजी कोठेकर यांचे मार्गदर्शन व या संपूर्ण कार्यामध्ये महापौर दयाशंकर तिवारी, शहराध्यक्ष प्रवीण दटके, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे, माजी महापौर संदीप जोशी व नंदाताई जिचकार, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, माजी सत्तापक्षनेता संदीप जाधव सर्व नगरसेवक व प्रभागातील सर्वसामान्य जनता यांची बहुमुल्य सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्याविना कोणतेही कार्य पूर्ण होणे शक्य नव्हते, अशा शब्दांत ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.