Published On : Wed, Oct 7th, 2020

संत्रा व मोसंबी फळांच्या पिक विमा योजनांचा निर्धारित वेळेत लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांकडून रब्बीचे नियोजन व खरिपाचा आढावा

नागपूर: भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी संत्रा आणि मोसंबी या पिकांचा पिक विमा काढण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. मोसंबी पिकासाठी 31 ऑक्टोंबर तर संत्रा पिकासाठी 30नोव्हेंबर मुदत ठेवण्यात आली आहे.

आज कृषी विभागाचा रब्बी हंगामाचे नियोजन व खरीप हंगामाच्या आढाव्याची बैठक वनामती कार्यालयामध्ये घेण्यात आली. या बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्यासाठी लागू असणाऱ्या फळ पीक विमा योजना अंतर्गत संत्रा व मोसंबी फळांच्या विम्याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याचे त्यांनी निर्देशित केले.

सोबतच जिल्ह्यातील रब्बी पिकाच्या नियोजनाबाबतची माहिती घेतली. तसेच खरीप संदर्भातील आढावा देखील घेण्यात आला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मिलिंद शेंडे, आत्माच्या प्रकल्प अधिकारी डॉ. नलिनी भोयर, कृषी विद्यापीठाचे उद्यान विद्या प्रमुख डॉ. आर. पी. गजभिये, प्राचार्य अर्चना कडू, जिल्हा उपनिबंधक ए.बी. कडू, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक गवळे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी सोयाबीन, कापूस व धान लागवडी संदर्भातील खरिपातील पिकांचा आढावा घेतला. आगामी काळामध्ये तारण व्यवस्था बळकट करणे, प्रशिक्षण वाढविणे, यासाठी लक्ष वेधण्याचे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘विकेल ते पिकेल, ही योजना बळकट करण्याचे निर्देश दिले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे, यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणते पीक घेणे आवश्यक आहे. कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे आवश्यक आहे. कोणत्या पिकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. पिकाला योग्य भाव कसा मिळेल, यासाठी जिल्ह्यातील माहितीचे योग्य संकलन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खरीपाचा सध्याचा फायदा बघून रब्बीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातील माहिती यावेळी जाणून घेतली. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जावा,यासाठी वेगळे प्रयोग करणारे शेतकरी व विशिष्ट पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत थेट संवाद साधला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मिलिंद शेंडे यांनी यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2020- 21 अंतर्गत जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांचा संत्रा लागवडीत समावेश व्हायचे आहे त्याची माहिती दिली. यामध्ये उमरेड, कळमेश्‍वर, काटोल, कामठी, कुही, नरखेड, नागपूर ग्रामीण, पारशिवनी, भिवापूर,रामटेक, सावनेर, हिंगणा या तालुक्यांमध्ये संत्रा लागवडीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संत्रा पिकासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत विमा हप्ता भरणे आवश्यक आहे. ज्यांनी कर्ज घेतले नाही ही त्यांनी सेतू ( कॉमन सर्विस सेंटर ) केंद्रातून विमा भरणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांनी जर योजनेत सहभागी होणे शक्य नसेल तर तसे घोषणापत्र सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे. त्यामुळे या फळबाग योजनेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवायचा नाही त्यांनी आपले घोषणापत्र दाखल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यामध्ये मोसंबी पिकासाठी कळमेश्‍वर, काटोल, नरखेड, नागपूर ग्रामीण, सावनेर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. मोसंबी पिकासाठी देखील वरील प्रमाणेच अटी व शर्ती असून या पिकासाठी मात्र 31 ऑक्टोंबरपर्यंत विमा हप्ता भरता येणार आहे. शेतकऱ्यांनी या वेळापत्रकाला लक्षात घ्यावे, असे आवाहनही शेंडे यांनी केले आहे.

या बैठकीमध्ये पुनर्रचित हवामान संदर्भात घेण्यात येणाऱ्या नोंदी, महामदत पोर्टल बाबतची देखील माहिती देण्यात आली. कोरोना काळामध्ये सर्व यंत्रणा व्यस्त असताना शेतकऱ्यांना रब्बी नियोजनासाठी योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना देखील बैठकीत करण्यात आल्या.