Published On : Wed, Oct 7th, 2020

सिमेंट रोड संदर्भात प्रलंबित कामांना गती द्या

Advertisement

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : १३ ऑक्टोबरला सर्व लोकप्रतिनिधींची आयुक्तांसोबत बैठक

नागपूर: शहरातील सिमेंट रोडचे अनेक भागात काम बंद आहेत तर काही भागांमध्ये अर्धवट काम राहिलेले आहे. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. यासंबंधी तातडीने दखल घेउन संबंधितांनी सिमेंट रोड संदर्भातील प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागपूर शहरातील सिमेंट रोड संदर्भात बुधवारी (ता.७) महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री अविनाश बारहाते, धनंजय मेंढुलकर, गुरूबक्षानी आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी शहरातील विविध भागांमध्ये प्रलंबित असलेल्या सिमेंट रोडच्या स्थितीचा आढावा घेतला. अनेक झोनमधील कार्यकारी अभियंत्यांकडे असलेल्या अपु-या माहितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सिमेंट रोड संदर्भात शहरातील सर्व आमदार आणि नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना करून, कामामध्ये येत असलेल्या त्रुटी दूर करणे आवश्यक आहे, असे सांगत महापौरांनी आयुक्तांशी फोनवरून संवाद साधला. प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी आयुक्तांकडून संपूर्ण विषयाचा अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार नागरिकांची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने लवकरात लवकर काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यादृष्टीने येत्या १३ ऑक्टोबर रोजी शहरातील सर्व आमदारांच्या उपस्थितीत आयुक्तांसह बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.