नागपूर:राज्यातील 4 कोटी एपीएल धारकांसाठी राज्य शासनाने काढलेला वादग्रस्त जीआर तातडीने बदलविण्यात यावा व 4 कोटी एपीएल धारकांना मार्च एप्रिल मध्ये अन्न द्यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.
या जीआरनुसार ज्या एपीएल धारकांकडे आज अन्न नाही. त्या कुटुंबाना आज अन्नाची गरज आहे. लॉक डाऊनच्या काळात लोकांना अन्नाची गरज असताना शासन मार्च एप्रिलचे अन्न देणार नाही असा निर्णय हा अन्यायकारक आहे. त्यामुळे हा जीआर त्वरित बदलण्याची विनंती ही बावनकुळे यांनी केली आहे.
केसरी रेशनकार्ड असलेल्या या 4 कोटी एपीएल धारकांना मार्च एप्रिलचे रेशन मिळत नाही. या सर्व लोकांना 2 रुपये किलोचे गहू, तांदूळ, डाळ देण्यात आली पाहिजे. संपूर्ण देशात कठीण परिस्थिती असताना असा जीआर काढलाच कसा जातो, याबद्दलही बावनकुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा निषेधार्ह जीआर ताबडतोब रद्द करण्यात येऊन सर्व एपीएल धारकांना त्वरित मार्च एप्रिलचे रेशन देण्यात यावे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.