Published On : Fri, Apr 2nd, 2021

अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळावे म.न.पा. आयुक्तांचे आवाहन

Advertisement

नागपूर: नागपूरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामासाठी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. विविध भागातील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही परिस्थिती लक्षात घेता नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी नागरिकांना मनपा मुख्यालय तसेच झोन कार्यालयात नागरिकांना अति आवश्यक कामाशिवाय येण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे. या संबंधात नुकतेच मनपा तर्फे मिशन बिगीन अगेन अंतर्गत आदेश निर्गमित केले आहे. या आदेशानुसार मनपा कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तातडीचे कामासाठीच पूर्व परवानगी घेऊन प्रवेश देण्यात येईल.

आयुक्तांनी महानगरपालिकेचे मुख्यालय तसेच झोन कार्यालयामध्ये नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय येण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास ते मनपाचे “नागपूर लाईव्ह सिटी ” मोबाईल ॲप वर तक्रार नोंदवू शकतात. या ॲपव्दारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्नशील असून त्यासाठी नागरिकांना मनपा मध्ये येण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना कोव्हिड-१९ संबंधी तक्रार असल्यास कोरोना नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ वर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात येत आहे.