Published On : Sat, Sep 25th, 2021

नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्सचा वर्धापन दिन 26 सप्टेंबर रोजी

Advertisement

नागपुर : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिन असणा-या नागपूरच्या मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था -एम्सचा वर्धापन दिन 26 सप्टेंबर 2021 , रविवार रोजी सकाळी 9 वाजता साजरा होणार असून याप्रसंगी दुरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या मुख्य अतिथीच्या स्थानी तर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एम्स नागपूरच्या संचालिका डॉ. विभा दत्ता यांनी आज दिली. राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे,केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, एम्स नागपूरचे अध्यक्ष प्रा. पी. दवे हेसुद्‌धा याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

एम्स नागपूरच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा बद्दल बोलताना डॉ. दत्ता यांनी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या 50 विद्यार्थ्यांपासून केलेली सुरुवात आता 125 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचली असल्याचे सांगितलं . पदवीत्युर विभागात सध्या 25 विद्यार्थी प्रवेशित असून प्रत्येक विषयासाठी 2 जागा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. सुपर स्पेशलिटीमध्ये कार्डिओलॉजी, नेफरोलॉजी, पल्मोनरी मेडिसिन आणि पीडियाट्रिक सर्जरी सारख्या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचीही अंमलबजावणी एम्समध्ये केली जात असून त्याचा फायदा विदर्भ व आसपासच्या राज्यातील लोकांना होत आहे. एम्स नागपूरच्या इमारतीच्या बांधकामात सौरउर्जा रुफटॉपचा वापर होत असल्याने विज बचत होत असल्याचेही डॉ. दत्ता यांनी सांगितले.

कोवीडच्या दुसऱ्या लाटेत तसेच म्युकरमायकोसिसच्या साथीमध्ये एम्सच्या डॉक्टर,नर्सिंग, व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्ण सेवा करण्यात आली . आरटी- पीसीआर चाचणी केंद्र महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये स्थापन करण्याकरिता 100 केंद्रांना मदत करण्यासाठी आयसीएमआरने एम्स नागपूरला मेंन्टर इंस्टिट्यूट म्हणून घोषीत केले होते. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्याकरिता 150 खाटेच्या क्षमता असलेल्या बालरोगविभागाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याच्या सुविधेसाठी एम्स परिसरात धर्मशाळेची स्थापना करण्यात आली असून येथे नाममात्र शुल्कात राहण्याची व्यवस्था असून भोजनासाठी ही व्यवस्था करून देण्यात आलेली आहे , अशी माहिती डॉ.दत्ता यांनी यावेळी दिली.