नागपुरात पुन्हा एकदा ‘अन्ना गँग’ सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. शहरातील वर्दळीच्या सीताबर्डी परिसरात अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने दोन कारचे काच फोडून लॅपटॉप आणि मौल्यवान साहित्य चोरी करण्यात आले. या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, यापूर्वीही शहरातील विविध भागांत अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडवणाऱ्या ‘अन्ना गँग’चा यात हात असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
पहिली घटना धीरन कन्या महाविद्यालयासमोर घडली. दिघोरी येथील आराधना नगरमध्ये राहणारे भूषण दुधे हे कंपनीच्या बैठकीसाठी येथे आले होते. त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली असताना अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगमध्ये सुमारे ८० हजार रुपयांची रोख रक्कम, मुलीचे जात प्रमाणपत्र, बँक पासबुक तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती.
या घटनेनंतर अवघ्या पाच मिनिटांतच वैरायटी चौकातील बाटा शोरूमसमोर उभी असलेल्या स्विफ्ट कारलाही चोरट्यांनी लक्ष्य केले. मनीष नगर येथील जयंती नगरीत राहणारे खासगी कंपनीतील व्यवस्थापक विपिन शर्मा यांच्या कारची काच फोडून आरोपींनी लॅपटॉप बॅग लंपास केली.
दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यामध्ये संशयित कारभोवती संशयास्पद हालचाली करताना आणि संधी साधून काच फोडून चोरी करताना दिसत आहेत.
शहरात वारंवार अशा पद्धतीच्या चोरीच्या घटना घडत असताना ‘अन्ना गँग’ अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. सीसीटीव्हीचे पुरावे समोर असूनही आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देत असल्याने या टोळीचा बंदोबस्त करणे नागपूर पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.





