मुंबई – राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा मोठा आर्थिक परिणाम इतर योजनांवर होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीच्या काळात गरीब कुटुंबांना वितरित होणारा ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार नसल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर वार्षिक तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचा भार येत असून, त्यामुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधीही वळवावा लागत आहे. परिणामी, इतर योजनांवर ताण येऊ लागला आहे.
‘आनंदाचा शिधा’ योजनेसाठी दरवर्षी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च होतात. मात्र, सध्याच्या आर्थिक अडचणींमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. “आर्थिक स्थिती सुधारली तर पुढील काळात पुन्हा सुरू करण्याचा विचार करू,” असे भुजबळ यांनी म्हटले.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरजू नागरिकांना या वर्षी दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नाही. विरोधकांनी या निर्णयावर टीका करताना म्हटले की, “एक योजनेसाठी इतर जनहिताच्या योजना बंद करणं म्हणजे सामान्य जनतेवर अन्याय आहे.”
‘आनंदाचा शिधा’ योजना कायमस्वरूपी बंद होणार की नाही, याबाबत सध्या स्पष्टता नाही. मात्र, सरकारने आपली अर्थव्यवस्था सावरल्याशिवाय अशा सुविधा पुन्हा पूर्ववत होतील, अशी चिन्हे आहेत.