Published On : Wed, May 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात चालू कूलरमध्ये पाणी भरताना करंट लागून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरचा मृत्यू

Advertisement

नागपूर– नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडगे नगर परिसरात एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. चालू असलेल्या कूलरमध्ये पाणी भरत असताना करंट लागून एका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवि भालापूरे (वय 36) असे मृतकाचे नाव असून ते मूळचे सावनेर तालुक्यातील मंगसा गावचे रहिवासी होते. रवि हे नंदनवन परिसरातील गाडगे नगर येथे भाड्याच्या घरात राहत होते आणि एका खासगी कंपनीत इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून कार्यरत होते.

मंगळवारी दुपारच्या सुमारास रवि घरातील सुरू असलेल्या कूलरमध्ये पाइपच्या साहाय्याने पाणी भरत होते. त्याचवेळी अचानक त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. करंट लागल्याने ते जागीच कोसळून बेशुद्ध झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मूल आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून नेमका करंट कसा लागला, याचा तपास सुरू केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.