पाणी पुरवठा प्रणालीचा होणार विस्तार आणि बळकटीकरण
नागपूर : नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनाधिकृत व स्लम अभिन्यासामध्ये पाणी पुरवठा प्रणालीचे विस्तारीकरण, उन्नतीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी ‘अटल मिशन फॉर रिजिन्युएशन ॲण्ड ट्रान्समिशन’ (अमृत) पाणी पुरवठा योजना अंमलात आणण्यात येत असून यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे ७२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे याकरिता आवश्यक निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून आवश्यक राशीची तरतूदही अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी केली आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. नागपूर शहराचा विस्तार चहुबाजूने होत असून नव्या वस्त्या निर्माण होत आहे. या शहराच्या सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये सद्यस्थितीत जलवाहिन्यांचे जाळे अस्तित्वात नाही. अशा भागात जलवाहिन्या टाकून नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याकरिता अमृत योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत/अधिकृत/स्लम अभिन्यासामध्ये पाणी पुरवठा प्रणालीचे विस्तारीकरण, उन्नतीकरण आणि बळकटीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत उंचीवरील ४२ जलकुंभ आणि जमिनीवरील एक जलकुंभ अशा एकूण ४३ जलकुंभाचा व ५९ कि.मी. मुख्य जलवाहिनी व ३७८ कि.मी. आंतरिक वितरण जलवाहिन्यांचा समावेश आहे, असे या योजनेचे स्वरूप आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या सुमारे १० लाख लोकांना पाणीपुरवठा करता येईल व महानगरपालिकेमार्फत टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्यावरील खर्च कमी होईल. नागपूर शहरात प्रगतीपथावर असलेल्या २४ बाय ७ ही अखंडित पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकरिता या योजनेचा उपयोग होईल.
सुधारीत प्रस्तावानुसार,मे. वाप्कोस यांना १७ उंचीवरील जलकुंभ आणि संबंधित मुख्य जलवाहिन्या, ३७७ कि.मी.च्या वितरण वाहिन्या ही कामे करावयाची आहे. आतापर्यंत १२ जलकुंभाची कामे प्रगतीपथावर असून २७० कि.मी. वितरण वाहिन्यांची कामे पूर्ण झाली आहे. महानगरपालिकेतर्फे १० उंचीवरील जलकुंभ (ESR) आणि एक जमिनीवरील जलकुंभ (GSR) करण्याचे प्रस्तावित आहे. यापैकी शेषनगर मौजा चिखली येथे कमी जागा उपलब्ध असल्याने या ठिकाणी दोन टाक्या बनविणे प्रस्तावित आहे. महानगरपालिकेद्वारे शहरात अशा प्रकारचे काम पहिल्यांदाच करण्यात येत आहे. तत्कालीन स्थायी समिती व जलप्रदाय समिती अध्यक्ष विजय (पिंटू) झलके यांनी तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले होते.


