अमरावती : अमरावती शहरातील राजेंद्र कॉलनी–विजय कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी एका युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत युवकाची ओळख आफाक शेख (रा. ताजनगर) अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी आफाक शेख याच्यावर गळा आणि छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. तसेच मृताच्या हाताचा पंजा तुटलेल्या अवस्थेत आढळल्याचीही माहिती समोर आली आहे.
गंभीर जखमी अवस्थेत आफाक याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत असून, आरोपींचा शोध सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.





