Published On : Sun, Jul 28th, 2019

अंबाझरी बायोडायव्हर्सिटी पार्कचे लोकार्पण संपन्न

नागपूर: ‘ग्रीन नागपूर’ ची संकल्पना ही जल व वायू प्रदूषणा पासून मुक्त शहर अशा प्रकारे साकारतांना ‘अंबाझरी जैवविविधता उद्यानाची’ स्थापना ही नागपूरच्या वैभव वाढविणारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज केले. स्थानिक वाडी- हिंगणा एम. आय. डी. सी. रोड वरील महानगरपालिकेच्या हॉट-मिक्स प्लांट जवळ असलेल्या जैवविविधता उद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी ते बोलत होते. याप्रसंगी उद्‌घाटक म्हणून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तर प्रमुख अतिथींच्या स्थानी वनमंत्री व वित्तमंत्री सुधिर मुनंगटीवार, वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके , उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव (वने) विकास खरगे, महापौर नंदाताई जिचकार प्रधान मुख्‍य वनसंरक्षक व वनबलप्रमुख यु.के. अग्रवाल, विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल प्रामुख्याने उपास्थित होते.

राज्याच्या वनविभागाने हाती घेतलेला ‘33 कोटी वृक्षलागवड’ संकल्प हा नक्कीच पूर्णत्वास जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वनविभाग यांच्यात एक सामंजस्य करार होणार असून महामार्गलगत वृक्षारोपणा संदर्भात वनविभागाचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. अंबाझरी तलावानजीक स्वामी विवेकानंदाचा पुतळा व मेट्रो स्टेशन तसेच प्रस्तावित फाऊंटेन शो यामूळे या परिसरात ‘इको टूरिझम’ वाढीस लगणार असल्याची अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

‘33 कोटी वृक्ष लागवड’ या अभियानात जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. पर्यावरण संवर्धनाविषयीचे महत्व ओळखण्यात भावी पीढी अग्रेसर ठरत आहे, असे मत मुख्यंमत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

जैवविविधता उद्यानाचे काम वेगाने पूर्ण झालेच त्याचप्रमाणे गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयाचेही उद्घाटन सप्टेंबर महिन्यात करण्यात येईल. शहराच्या मध्यभागा पासून 5 ते 6 किमी वर असणा-या या जंगलाच्या भागात 160 पक्ष्यांच्या प्रजाती असून ‘अर्बन फॉरेस्ट’ म्ह्णून हा भाग आता आस्तित्वात आला आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

जैवविविधता ही महत्वाची असून राज्यशासनाने 25 हजार ग्राम पंचायती पैकी 16 हजार ग्राम पंचायतींमध्ये जैवविविधता समित्या स्थापन केल्या आहेत. 33 कोटी वृक्षलागवड मोहीमे अंतर्गत आता पर्यंत सुमारे 17 कोटी 45 लक्ष इतकी वृक्ष लागवड राज्यात झाली आहे. हरित सेने मध्ये सामील होऊन वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाला सर्व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन वनमंत्री व वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी केले.

 

या उद्यानात 21 किमीचा ट्रॅक असून त्यातील 11 किमी हा सायकलिंग व 5 किमी ‘वॉकिंग’ ट्रॅक आहे. हा पार्क ‘अर्बन फॉरेस्ट’ म्हणून विकसित झाला असून पक्षीनिरिक्षक व निसर्गप्रेमीसांठी आकषर्णाचे स्थळ म्ह्णून नावारुपास आला आहे. एम. आय. डी. सी. व नागनदीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन या उद्यानातील वृक्षांच्या लागवडीसाठी ठिबक सिंचनाव्दारे पाण्याची व्यवस्था केली आहे. या परिसरात 20 कुत्रिम तलावांद्वारे जलसंवर्धनाची कामेही झाली आहेत, अशी माहिती वन्यराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी अंबाझरीच्या उद्यानातील पक्षी वैभवाची माहिती देणा-या ‘अंबाझरी बर्डस्’ या माहिती पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अंबाझरी पार्कच्या लोगो डिझाईन स्पर्धेत प्रथम आलेल्या सेवा सदन सक्षम विद्यालय नागपूरच्या विद्यार्थीनी आर्या निमजे व ई-सायकल बनविणारे प्रज्वल टेंभूर्णे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ई-वाहन व सायकल ट्रेकचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी वन विभागाचे वरिष्ठ अ‍धिकारी, कर्मचारी , स्थानिक लोकप्रतिनिधी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपास्थित होते.