नागपूर : शहरातील अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग देत नागपूर गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने मोठी कारवाई करत ९ ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून ड्रग्ससह मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ येथील शिवाजीनगर कॉम्प्युटर भवनाजवळ, स्पोर्ट्स सेंटरसमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. गुन्हे शाखेचे एनडीपीएस पथक गस्त घालत असताना दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन युवकांना अडवून त्यांची झडती घेतली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून ९ ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख नावेद ऊर्फ नेहाब शेख आणि लखन हिरणवार अशी आहे. पोलिसांनी आरोपींकडून एमडी ड्रग्स, दोन मोबाईल फोन आणि एक मोपेड जप्त केली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नावेद शेख याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तर लखन हिरणवार याच्यावर खून आणि अमली पदार्थ तस्करीसह गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी एमडी ड्रग्स कुठून आणली आणि ती कोणाला पुरविण्यात येणार होती, याचा तपास पोलीस करत आहेत.





