Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 18th, 2019

  प्रभागातील समस्या सोडविण्यास सदैव तत्पर : महापौर नंदा जिचकार

  हनुमान नगर झोनमध्ये महापौर आपल्या दारी

  नागपूर : शहरातील मनपाच्या अंतर्गत येणा-या सर्व प्रभागातील समस्या सोडविण्यास सदैव तत्पर असल्याचे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी दिले. महापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता. १८) हनुमान नगर झोनमधील प्रभाग ३२ व ३४ चा दौरा केला व नागरिकांशी संवाद साधला.

  यावेळी हनुमान नगर झोन सभापती रुपाली ठाकूर, नगरसेवक सतीश होले, डॉ. रवींद्र भोयर, राजेंद्र सोनकुसरे, दीपक चौधरी, अभय गोटेकर, नागेश मानकर, नगरसेविका मंगला खेकरे, कल्पना कुंभलकर, माधुरी ठाकरे, सहायक आयुक्त विजय हुमने, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  शुक्रवारी (ता. १८) महापौर नंदा जिचकार यांनी हनुमान नगर झोनमधील प्रभाग ३२ व ३४ अंतर्गत हनुमान नगर उद्यान, मानेवाडा, अभय नगर, राजश्री नगर, खानखोजे नगर, ताजनगर, बजरंग नगर, सावित्रीबाई फुले नगर आदी ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.

  हनुमान नगर उद्यानातून महापौर नंदा जिचकार यांनी दौ-याला सुरूवात केली. तत्पुर्वी हनुमान नगर ज्येष्ठ नागरिक युवा मंडळातर्फे महापौर नंदा जिचकार यांचे स्वागत करण्यात आले. उद्यानाच्या देखरेखीचे पालकत्व मिळण्याबाबत मंडळाच्या वतीने यावेळी महापौरांना विनंतीपत्रही देण्यात आले. मानेवाडा येथील नाल्यामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाले किंवा इतर ठिकाणी कचरा टाकणे हा गुन्हा अशी व्यक्ती आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

  अभय नगर येथील उद्यानातही उडान महिला संघटनेतर्फे महापौरांचे स्वागत करण्यात आले. परिसरात गायी, म्हशी पाळण्यात येत असल्याने नेहमी दुर्गंधी असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गायी, म्हशी पालकांसाठी वेगळे नंदी ग्राम रहिवासी क्षेत्र विकसीत करण्यात येत असून या ठिकाणी शहरातील सर्व गायी, म्हशी पालकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी नागरिकांना सांगितले. महानगरपालिकेने निर्धारित करून दिलेल्या वेळेत सफाई कर्मचारी खासगी कामे करीत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. अशा कर्मचा-यांवर कारवाई करून संपूर्ण प्रभागात स्वच्छता कायम राहावी, यासाठी योग्य कार्यवाही करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

  अभय नगर परिसरामध्येच रहिवासी क्षेत्रामध्ये टाईल्स, मार्बलचे गोडाउन आहे. या गोडाउनमधील टाईल्स, मार्बलचा कचरा रस्त्यालगतच्या मोकळ्या भूखंडामध्ये टाकला जातो. शिवाय रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने स्थानिक नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. रहिवासी क्षेत्रामध्ये गोडाउनला देण्यात आलेल्या परवानगीबाबतची सर्व माहिती तपासून योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

  राजश्री नगर येथे कलोडे महाविद्यालयाच्या मैदानाच्या लगत वाहणा-या नाल्याचा प्रवाह बिल्डरकडून बदलविण्यात आल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात आली. नाल्याचा नैसर्गीक प्रवाह बदलविणे हा गंभीर प्रकार असून यासंबंधी सर्व कागदपत्रांची पडताडणी करून यावर योग्य कारवाई करण्याचे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी आश्वासित केले.

  यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी खानखोजे नगर येथील मनपा दुर्गानगर माध्यमिक शाळेला भेट देउन येथील सुविधांची पाहणी केली. शाळेच्या परिसरात व प्रसाधनगृहामध्ये नियमीत स्वच्छता राहावी, याची विशेष काळजी घेण्याचेही त्यांनी अधिका-यांना निर्देशित केले. शाळेच्या मैदानात रात्री असामाजिक तत्वांचा वावर असून या मैदानाचा विकास करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरातील मैदानांचा विकास करून विविध खेळांचे मैदान व आवश्यक सुविधा देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये येथील मनपा दुर्गानगर माध्यमिक शाळेच्या मैदानाचाही समावेश असून त्याअंतर्गत या मैदानावर खेळासाठी अत्यावश्यक सुविधा तसेच प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. याशिवाय ताज नगर, बजरंग नगर, सावित्रीबाई फुले परिसरातही महापौर नंदा जिचकार यांनी भेट देउन नागरिकांशी संवाद साधला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145