| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 18th, 2019

  शहराच्या विकासवाटा दर्शविणारा रामझुला जनतेसाठी खुला

  रामझुला उडाण पुलाच्या दुस-या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

  नागपूर : नागपूर शहर संपूर्ण देशात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. शहरात सर्वत्र सुरू असलेल्या विकास कामांमुळे देशपातळीवर नागपूर शहराने आपली वेगळी छाप सोडली आहे. नागपूरच्या विकासावाटा दर्शविणा-या रामझुल्याच्या दुस-या टप्प्याचे शुक्रवारी (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले. या उडाण पुलामुळे नागपूरकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या पुलामुळे रेल्वे स्टेशनलगतच्या जयस्तंभ चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शुक्रवार (ता. १८)पासून रामझुला वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

  लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, डॉ. मिलींद माने, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयशंकर तिवारी, प्रवीण दटके, ॲड. संजय बालपांडे, जिल्हाधिकारी अश्वीन मुद्गल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, मुख्य अभियंता उल्हास देबाडवार, मुख्य अभियंता सुधाकर मुरारे, अधीक्षक अभियंता उज्जवल डाबे, मनोज तालेवार आदी उपस्थित होते.

  पुर्वीच्या अस्तित्वातील १०० वर्ष जुन्या कमानी पुलाऐवजी नवीन ६ पदरी नवीन रेल्वे उडाण पूल बांधण्याच्या सुधारित प्रस्तावास रेल्वे विभागाने मंजुरी प्रदान केली. त्यानुसार सुधारित प्रस्तावाप्रमाणे बांधकामासाठी ६९.६२ कोटी खर्च आला आहे. नागपूर शहर एकात्मिक योजनेमध्ये संत्रा मार्केट येथील सहा पदरी केबल स्टेड रेल्वे उडाण पुलाचे काम समाविष्ट असून यासाठी ३५० कोटी रूपये खर्चाची योजना बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर मंजुर केली होती.

  नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या ५१७.३६ कोटी रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकास शासनाने नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे. जुना रेल्वे उडाण पूल तोडण्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण करण्यात आले. यामध्ये सुमारे १३० टन क्षमतेची क्रेन तसेच वायर सॉ यांचा उपयोग करून पुलाचा प्रत्येक भाग कापून वरचेवर क्रेनने काढण्यात आला. हे काम करताना खाली असणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.

  राज्यात अशा स्वरूपाचे केबल स्टेड उड्डाण पूल असून वांद्रे वरळी सागरी सेतू आणि संत्रा मार्केट उड्डाण पुलाचा समावेश आहे. दोन्ही पूल रस्ते विकास महामंडळाने बांधले आहेत. या कामाचे कंत्राट मे ॲफकॉन्स इन्फ्रा. लि. मुंबई यांची असून मे. राईटस्‍ लि. नागपूर प्रकल्प सल्लागार व्यवस्थापक आहेत. पुलाची एकूण लांबी (पोचमार्गासह) ६०६.७४२ मीटर असून केबल स्टेड पुलाची लांबी २०० मीटर एवढी आहे. या कामाची सुधारित मंजूर किंमत ६९.६२ कोटी एवढी आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145