Published On : Sat, Jun 10th, 2017

सर्व पाणीपुरवठा योजना सोलरवर आणणार: ना. बावनकुळे

Advertisement
  • महावितरणच्या कोराडी येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन
  • जिल्ह्यात 1600 कोटी रुपयांची विज यंत्रणा विकासाची कामे सुरु


नागपूर:
जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांना सोलर पंप बसवून सोलरवर आणण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीने फक्त अर्ज करावा. शासन पाणीपुरवठा योजनांना सोलरपंप लावून देईन. त्यामुळे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल येणार नाही. जिल्ह्यासोबतच राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या नळयोजना सोलरवर आणण्याची योजनाही आखली जात असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्कमंत्री मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

कोराडी येथे महावितरणच्या पायाभूत आराखडा 2 अंतर्गत 33/11 केव्हीचे उद्घाटन करताना ऊर्जामंत्री बोलत होते. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, भाजप नेते अनिल निधान, सभापती अनिता चिकटे, राजेश रंगारी, सरपंच अर्चना मैंद, उपसरपंच अर्चना दिवाने, राम तोडवाल, न.प. अध्यक्ष सीमा जयस्वाल, विवेक मंगतानी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते, उपकेंद्राच्या नामफलकाचे अनावरण व पॉवर ट्रान्सफॉर्मर चार्ज करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना ना. बावनकुळे म्हणाले की राज्यात वीज पुरवठ्याच्या दुरुस्ती, नवीन व विजेच्या विविध कामांसाठी 13 हजार कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने दिला आहे. त्यापैकी 1662 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला मिळाले असून त्यांतर्गत विविध कामे सुरु आहेत. 40 ते 50 टक्के कामे झाली आहेत. कोराडी, महादुला, कामठी, मौदा ही गावांमधील वीजयंत्रणा लवकरच भूमिगत करण्यात येईल.


शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु झाली आहे. या अंतर्गत शेतकर्‍याच्या शेतातच वीज निर्माण करून तेथेच ती शेतकर्‍यांना मिळणार आहे. 700 ते 800 शेतकर्‍यांना सौर ऊर्जेच्या एका फीडरवरुन वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच शेतकर्‍यांना एनर्जी एफिशिएन्सी पंपही शासन देणार आहे. जिल्ह्यात 500 शेतकर्‍यांना वैयक्तिकरीत्या हे पंप फक्त 25 हजार रुपयांत देऊ. कोराडी महोत्सवाअंतर्गत 200 कोटींची कामे सुरु आहे. मंदिराकडे येणार्‍या कालव्यावर स्लॅब टाकून भाविकांसाठी रस्ता निर्माण करण्यात येणार आहे. कोराडी तलाव विकासाअंतर्गत 200 कोटींची कामे होणार आहे. महादुला येथे महानिर्मितीच्या 14 हेक्टर जागेवर स्वस्त घरे बांधून देण्यात येतील. ही जागा नगर पंचायतीला हस्तांतरण करण्यात येईल, असा विकास कामांचा सविस्तर आढावा त्यांनी जनतेसमोर ठ़ेवला. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांचेही यावेळी भाषण झाले.

मुख्य अभियंता शेख यांनी या उपकेंद्राची माहिती सांगितली. 216 लक्ष रुपये या कामावर खर्च झाले असून या भागातील शेतकर्‍यांना आणि नागरिकांना आता पूर्ण दाबाने व अखंडित वीजपुरवठा होईल, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला महावितरणच्या नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, पायाभुत आराखदाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे, स्थापत्य मंडलचे अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू यांचेसह अनेक अभियंते, अधिकारी, कर्मचार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.