Published On : Mon, Dec 17th, 2018

‘सर्वांसाठी घरे, अन्न आणि आरोग्य’ला प्राधान्य

Advertisement

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा लकडगंज झोनमध्ये जनसंवाद : मार्च २०१९ पर्यंत सर्वांना मिळणार लाभ

नागपूर : सर्वांना हक्काची घरे मिळावीत, रेशनचे धान्य मिळावे आणि आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णाला त्याचा लाभ मिळावा ह्या तीन गोष्टींवर शासन प्राधान्यक्रमाने लक्ष देत आहे. नागपुरातील जनतेलाही तीनही योजनांचा लाभ मिळावा. शासनाच्या निर्णयानुसार, नागपुरातील सन २०११ पूर्वीच्या सर्व अतिक्रमितांना मालकी हक्काचे पट्टे मिळतील. केसरी राशन कार्डधारकांना केवळ स्वसाक्षांकित ५९ हजार रुपयांचा उत्पन्नाचा दाखला देऊन धान्य मिळेल आणि पंतप्रधान आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णांवर उपचार होतील. मार्च २०१९ पर्यंत सर्व लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नागपूर शहरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका झोननिहाय जनसंवाद कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याच नियोजनांतर्गत सोमवारी (ता. १७) लकडगंज झोनमध्ये ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे,ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर, चेतना टांक, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, नगरसेवक प्रदीप पोहाणे, शेषराव गोतमारे, राजकुमार शाहु, अनिल गेंडरे, निरंजना पाटील, मनिषा अतकरे, सरीता कावरे, कांता रारोकर, वैशाली रोहणकर, मनिषा धावडे, पोलिस उपायुक्त माथणीकर यावेळी उपस्थित होते.

सन २०११ पूर्वीच्या राज्यातील सर्व अतिक्रमितांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २५ हजार मालकी पट्ट्यांचे कार्य झाले असून उर्वरीत सर्व पट्ट्यांचे वाटप लवकरच होईल, असे ते म्हणाले. मालकी हक्काचे पट्टे मिळाल्यानंतर ज्यांचे टिन शेडचे घर आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये घर बांधकामासाठी मिळणार आहे. केशरी रेशन कार्ड धारकांनाही आता रेशन दुकानातून धान्य मिळणार आहे. त्यासाठी केवळ ५९ हजार रुपये उत्पन्न असल्याचे स्वसाक्षांकित प्रमाणपत्र त्यांना द्यायचे आहे. नागरिकांचे अर्ज यावे यासाठी नगरसेवक मदत करतील. अधिकाऱ्यांनीही सर्व रेशन दुकानांसमोर शिबिर लावावे. याबाबत जनजागृती करावी आणि नागरिकांकडून अर्ज घ्यावे, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. गरीब रुग्णांवर चांगले उपचार व्हावे यासाठी त्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

सर्व दिव्यांग आणि दुर्धर आजार रुग्णांची यादी करा
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी कुठलीही अडचण यायला नको. शासकीय, खासगी शाळेतील अशा विद्यार्थ्यांची तातडीने एक यादी १५ दिवसांत तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. इतकेच नव्हे तर अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचण येत असेल तर समाजकल्याण कार्यालयातच त्यांचे ऑफलाईन अर्ज घेऊन ते ऑनलाईन भरून देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दुर्धर आजार असलेल्यांसाठीही शासनाच्या अनेक योजना आहेत. अशा व्यक्तींचीही यादी तातडीने तयार करून प्रशासनाने त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना लाभ द्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

वीज मीटरचे अर्ज मार्गी लावा
एसएनडीएल कडे वीज मीटर साठी अर्ज देऊनही ते निकाली काढण्यात आले नाहीत. अनेक महिन्यांपासून हे अर्ज प्रलंबित असल्याची तक्रार लकडगंज झोनअंतर्गत असलेल्या वस्त्यांतील नागरिकांनी केली. यावर एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाचे कारण सांगितले. त्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांची बैठक जनसंवाद कार्यक्रमानंतर घेण्याचे जाहीर केले. वीज मीटर कनेक्शनसाठी आलेले अर्ज तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अस्वच्छ रिक्त भूखंड सरकारजमा करा
खुल्या खासगी भूखंडावर नागरिक कचरा टाकतात. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होतो. यासंदर्भात जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी तक्रार केली. अनेक भूखंडांच्या मालकांचे पत्ते माहिती नसल्यामुळे त्यांना नोटीस पाठविण्यात अडचण येत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगताच जे भूखंड अस्वच्छ आहेत, असे भूखंड सरकारजमा करावे. तसे आदेश मनपा आयुक्तांनी निर्गमित करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

थेंब-थेंब पाण्याचे नियोजन करा
ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी साडे तीन महिन्यात एकाच अपार्टमेंटमध्ये १५८ टँकर पाठविल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाण्याचे ऑडिट करा. थेंब-थेंब पाण्याचे नियोजन करा, असे निर्देश दिले. पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. याचा जो अपव्यय करेल, त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करून त्यांना पुनर्जिवीत करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत.

कबाडीवाल्यांसंदर्भात लवकरच बैठक
लकडगंज झोनअंतर्गत काही भागांमध्ये कबाडीवाल्यांमुळे बराच कचरा होतो. त्यासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्या कबाडीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या प्रश्नावर पोलिस आयुक्तांसोबत लवकरच एक बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी तक्रारकर्त्याला दिली.

तृतीयपंथियांसाठी स्वच्छतागृहे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात तृतीयपंथियांचे शिष्टमंडळ आले होते. तृतीयपंथियांना जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्यासाठी शहरात स्वतंत्र स्वच्छतागृहे तयार करण्यात यावे, घरकुल योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा, अधिकृत तृतीयपंथियांना शासनातर्फे ओळखपत्रे देण्यात यावीत आणि तृतीयपंथियांच्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी व्हायला हवी, ही मागणी त्यांनी रेटली, यावर, तृतीयपंथियांसाठी स्वच्छतागृहे तयार करण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरात सर्वे करून आणि जागेची निश्चिती करून निर्णय घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अन्य प्रश्नांवरही लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांना दिले.