Published On : Wed, May 1st, 2019

मतमोजणी सकाळी 8 वाजतापासून सुरु होईल यादृष्टीने संपूर्ण नियोजन करा – मुदगल

Advertisement

कळमना मार्केट येथील मतमोजणी व्यवस्थेचा आढावा
23 मे रोजी नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी
मतमोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था
प्रसार माध्यमांकरिता स्वतंत्र कक्ष

नागपूर : लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 23 मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन करुन आवश्यक सर्व सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिल्यात.

छत्रपती सभागृहात लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रत्यक्ष मतमोजणीसाठी करावयाच्या व्यवस्थेचा आढावा नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, अविनाश कातडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारींगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, अन्न धान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भुयार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक एस.आर. केकरे, लेखाधिकारी विनित तिवारी आदी उपस्थित होते.

रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात दोन स्वतंत्र हॉल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार यांच्यासह विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष मतमोजणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय होणार असून यासाठी प्रत्येकी 14 टेबलवर ही मतमोजणी होईल. मतमोजणीच्यावेळी संपूर्ण व्हीडिओग्राफी करण्यात येणार असून 50 व्हीडिओग्राफर यासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये केंद्रीय राखीव दलाच्या सुरक्षिततेखाली ठेवण्यात आल्या असून दि. 23 मे रोजी सकाळी 6.30 वाजता विविध राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर उघडण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी 8.30 वाजता सुरुवात होईल. मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना प्रत्यक्ष मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांची असून तेथील सुरक्षा तसेच फेरीनिहाय मतमोजणी करण्याकरिता आवश्यक व्यवस्था जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारींगे हे करणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतमोजणी कक्षाची रचना तयार करणे, व त्यानुसार टेबलची मांडणी, प्रसार माध्यम केंद्र, संवाद कक्ष, अग्निशमन व्यवस्था तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा आदी पायाभूत सुविधांची जबाबदारी कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांच्याकडे राहणार आहे. वाहन व्यवस्थेची जबाबदारी अन्न धान्य वितरण अधिकारी लिलाधर वार्डेकर, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सहसंचालक एस.आर.केकरे हे करणार आहेत. सिलिंग व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, मतदान यंत्राची वाहन व्यवस्था उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भुयार आदि करणार आहेत. मतमोजणी अत्यंत पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्याच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.