Published On : Sat, May 5th, 2018

‘पुढचे पाऊल’ या दिल्लीतील मराठी संस्थेला आवश्यक सर्व सहकार्य करु – महसूलमंत्री चंद्रकात पाटील

नवी दिल्ली : “महाराष्ट्र राज्याने देशाला खूप काही दिले आहे. आपली संस्कृती, कला, पर्यटन, 720 किलोमीटरचा समुद्री किनारा, जागतिक वारसा स्थळे आदी महाराष्ट्राची ओळख विश्वस्तरावर व्हावी, तसेच राज्याचा ठसा सगळीकडे उमटविण्यासाठीच्या अथक प्रयत्नांना, “पुढचे पाऊल” या दिल्लीतील मराठी संस्थेला राज्य शासन सर्व परीने सहकार्य करेल” असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत सुरु असलेल्या दोन दिवसीय “महाराष्ट्र महोत्सवात” दिले.

‘पुढचे पाऊल’ ही दिल्लीतील संस्था व महाराष्ट्र शासनाच्या सयुंक्त विद्यमाने येथील कस्तुरबागांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात, श्री पाटील बोलत होते. यावेळी पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल, राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती, खासदार दिलीप गांधी ,परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव व पुढचे पाऊल संस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर मुळे आणि महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला मंचावर उपस्थित होत्या.

कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुढचे पाऊल या संस्थेचे कौतुक करत, रायगडावर आगामी 6 जून रोजी होणा-या, छत्रपती शिवाजी महाराज जयंती या राष्ट्रीय सणात सहभागी होण्यासाठी उपस्थितांना आंमत्रित केले.

राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन विषयावर बोलतांना सांगितले की, महाराष्ट्राचा ठसा विश्वस्तरावर उमटविण्याची गरज आहे. सुदैवाने राज्याला 720 किमी समुद्री किनारा, डॉल्फीन, स्कूबा डायविंग, व्याघ्र प्रकल्प, 420 किल्ले आदिंचा मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. या सर्वांची ओळख जागतिक स्तरावर होण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर जाहिराती देण्याचे निर्णय घेतले आहे. याशिवाय महाराष्ट्र ॲग्रो टुरिझम, ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी राज्यात विविध महोत्सवाचे आयोजन करण्याचेही मानस आहे अशी माहिती दिली. भारतीय प्रवासी दिनाच्या धर्तीवर “प्रवासी मराठी दिवस” साजरा करु, ज्यांने पुढचे पाऊल संस्थेच्या माध्यमाने व सहकार्याने देश-विदेशातील सर्व मराठी बांधव, मंडळे व अधिकारी एकत्रित होतील व या मेळाव्याचे महाराष्ट्राला सर्व दृष्टीने लाभ होईल व राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

यावेळी पुढचे पाऊल संस्थेची वेबसाईटचे उद्घाटन श्री. जयकुमार रावल यांनी केले तर संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले.