Published On : Sat, May 5th, 2018

बांधकाम व्यावसायिकांनी सुंदर इमारतींद्वारे स्मार्ट शहरे निर्माण करावीत – राज्यपाल

मुंबई: देशाच्या जडणघडणीत बांधकाम व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. सुंदर इमारती बांधून अधिकाधिक स्मार्ट शहरे निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. ते आज क्रेडाई-एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे आयोजित गोल्डन पिलर रिअल इस्टेट अवार्ड्स कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडांगणावर पार पडला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, मुंबईत ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि सुंदर इमारती उभ्या राहिल्या. या शहराला सुंदर बनवले. आज मुंबई जगाच्या पातळीवर सुंदर शहर बनले असून देशाची अर्थिक राजधानी म्हणून नावलौकिक आहे. दोन कोटी लोकसंख्येचे हे शहर आता जगातिक दर्जाचे सुंदर शहर म्हणून ओळखले जावू लागले आहे.

प्रधानमंत्री मोदीजी यांचे 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 4 लाख घरे बांधली असून 2019 पर्यंत आणखी 12 लाख घरे उपलब्ध होणार आहेत. असे सांगून राज्यपाल म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांचे अनेक प्रश्न आहेत. जागेची उपलब्धता, विविध परवानग्या, ग्राहकांना बँकेचे कर्ज देणे अशा अडचणी सोडविण्यासाठी सरकारने एक खिडकी योजना सुरु करुन दिलासा दिला आहे. आज देशामध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती ही बांधकाम क्षेत्रात असून त्यानंतर कृषी क्षेत्रात रोजगार आहे. देशाच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचे योगदान मोठे आहे. महारेरामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळून या क्षेत्रावरील त्यांचा विश्वास वाढला आहे. ग्राहकांना चांगली घरे देण्याचे, कमी उत्पन्न गटातील गरिबांना घरे देण्याचे मोठे आव्हान विकासकांवर आहे. त्यांनी या कामी पुढाकार घेऊन ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करावा.

यावेळी त्यांनी गोल्डन पिलर रिअल इस्टेट अवार्ड्स विजेत्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच प्रकाश महेता आणि सुभाष देसाई यांच्या हस्तेही विजेत्यांना यावेळी पारितोषिक देण्यात आली. त्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी क्रेडाईचे अध्यक्ष मयुरेश शहा यांनी प्रास्ताविक केले, यावेळी बांधकाम उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक उपस्थित होते.