Published On : Mon, Apr 5th, 2021

ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथील सर्व मेट्रो स्टेशन आता प्रवासी सेवेकरिता उपलब्ध

Advertisement

काँग्रेस नगर,छत्रपती चौक, उज्ज्वल नगर आणि धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन उद्या पासून प्रवासी सेवेत

नागपूर : उद्या दिनांक ०६ एप्रिल २०२१ पासून ऑरेंज लाईन मार्गिकेवरील काँग्रेस नगर,छत्रपती चौक आणि उज्ज्वल नगर तसेच ऍक्वा लाईन मार्गिकेवरील धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन अनलॉक होणार असून सदर स्टेशन वरून प्रवासी सेवा सुरु होणार आहे. उल्लेखनीय आहे कि या चारही मेट्रो स्थानकांना नुकतेच रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधीचे प्रमाणपत्र महा मेट्रोला प्रदान केले होते. हे चारही मेट्रो स्टेशन सुरु झाल्याने रिच – १ आणि रिच – ३ ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील सर्वच मेट्रो स्टेशन आता प्रवासी सेवेकरिता उपलध राहणार असून नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या एकूण २२ मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता कार्यरत असतील. सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत व सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर दरम्यान मेट्रो सेवा सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजतापर्यंत उपलब्ध असेल.

जास्तीत जास्त नागरिकांनी करावा मेट्रो सेवेचा उपयोग – डॉ. ब्रिजेश दीक्षित : काँग्रेस नगर,छत्रपती चौक,उज्ज्वल नगर आणि धरमपेठ कॉलेज,नगर मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु होण्याच्या औचित्याने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षिता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदूषणमुक्त वाहतुकीचा अवलंब करून मेट्रो सेवेचा उपयोग करावा व आपल्या सोबत इतरांना देखील मेट्रोचा वापर करण्यास प्रेरित करावे असे आवाहन डॉ. दीक्षित यांनी नागरिकांना केले.

ऑरेंज लाईन मार्गिकेवरील उज्ज्वल नगर (८८००.००), छत्रपती चौक (१२५६८.००),काँग्रेस नगर (८१००. ००) ऍक्वा लाईन वरील धरमपेठ कॉलेज (५४२७. ०३) वर्ग मीटर क्षेत्रामध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. स्टेशनच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

•धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन : उत्तर अंबाझरी मार्गावरील धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन ‘अँक्वा थीम’ वर बनविण्यात आले आहे. हिंगणा मार्गावर शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते.

•कॉंग्रेस नगर मेट्रो स्टेशन : काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन अजनी रेल्वे स्टेशनशी जुळले असून भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना अजनी रेल्वे स्टेशन येथे उतरताच मेट्रो ट्रेनने प्रवास करता येईल. महा मेट्रोने अजनी रेल्वे स्टेशनच्या पहिल्या फ्लॅटफॉर्म येथून मेट्रो स्टेशनला जोडले आहे.ज्यामुळे नागरिकांना सहज पणे मेट्रो स्टेशन परिसरात पोहचता येईल तसेच मेट्रोचा उपयोग करून अजनी मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचून पुढील यात्रा करणे शक्य होईल. मुख्य म्हणजे अजनी रेल्वे स्टेशन येथून मोठ्या प्रमाणात नागरिक देशाच्या अन्य ठिकाणी जाण्याकरता या ठिकाणाहून प्रवास करीत असतात त्यामुळे रेल्वे प्रवाश्याना निश्चितच याचा फायदा होईल. या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या शाळा, कॉलेज येथील विद्यार्थ्याना करिता देखील उपयुक्त ठरेल.

•छत्रपती चौक मेट्रो स्टेशन : छत्रपती नगर चौक बाहेर गावावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यान करता प्रमुख केंद्र आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या सुरुवातील छत्रपती नगर उड्डाणपूलच्या ऐवजी मेट्रो रेलचे पिलर निर्माण कार्यास सुरुवात झाली. छत्रपती नगर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. राणा प्रताप नगर चौक ते छत्रपती चौक आणि रचना मेट्रो स्टेशन टी पॉईंट चे अंतर बहुतांश समान असल्याने विशेषकर बर्डी,गांधीबाग,रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, इतवारी आणि पूर्व, दक्षिण व उत्तर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांन करिता दोन्ही मार्ग अनुकूल आहे.

•उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन : छत्रपती नगर चौक प्रमाणेच उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन देखील बाहेर गावावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यान करता प्रमुख केंद्र आहे तसेच या परिसरातून म्हणजेच मनीष नगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांना या मेट्रो स्टेशनमुळे मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तसेच अनेक कर्मचारी मोठ्या प्रमाणात मिहान येथील कंपनी मध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त नागरिकांना स्टेशन सुरु झाल्यास याचा लाभ मिळेल.

प्रवासी सेवेकरिता कार्यरत मेट्रो स्टेशनची नावे पुढील प्रमाणे :
•(ऑरेंज लाईन : सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) : सिताबर्डी इंटरचेंज, काँग्रेस नगर,रहाटे कॉलोनी,अजनी चौक,छत्रपती चौक, जय प्रकाश नगर,उज्ज्वल नगर, एयरपोर्ट, एयरपोर्ट साऊथ,न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशन .

•(ऍक्वा लाईन : सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर) : सिताबर्डी इंटरचेंज,झांसी राणी चौक,इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, शंकर नगर,एलएडी चौक,धरमपेठ कॉलेज,सुभाष नगर,रचना रिंग रोड जंक्शन,वासुदेव नगर, बंसी नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन .