Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Oct 14th, 2019

  मतदान केंद्रावर दिव्यांगांना सर्व सुविधा -रविंद्र ठाकरे

  नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये. याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे दिव्यांग मतदारांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक तसेच संबंधित अधिकारी यांची जनजागृती कार्यशाळा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

  यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, दिव्यांगांचे जिल्हा नोडल अधिकारी अभिजित राऊत, नोडल अधिकारी डॉ. नितीन ठाकरे, सहाय्यक अभियंता श्रीमती रसिका कवाडे, उमरेड तहसील कार्यायाचे मंडळ अधिकारी प्रकाश हारगुडे, काटोलचे नायब तहसिलदार विजय डांगोरे, कळमेश्वर नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी श्रीमती सुनीता काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी ‘ एकही मतदार सुटता कामा नये’ हे यंदाच्या निवडणुकीचे ब्रीद वाक्य असून सर्व पात्र मतदारांबाबत विशेषत: दिव्यांग मतदारांबाबत अधिक जागृत राहण्याचे निर्देश दिलेत. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, विजेची सोय, दिव्यांग मतदारांना मतदान कक्षात जाताना काही त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध राहावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दिव्यांग मतदारांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याबरोबरच त्यांना मतदानासाठी रांगेत थांबावे लागू नये याची काळजी घेण्याबाबत त्यांनी सांगितले.

  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पी. डब्ल्यू. डी. (पिपल वीथ डिसॲबिलिटीज्) ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपमध्ये दिव्यांग मतदारांनी नोंदणी केल्यास त्यांना मतदार केंद्रामध्ये जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील 12 हजार 87 दिव्यांग्यांनी या ॲपमध्ये नोंदणी केली आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय असल्याचेही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी या ॲपवर केवळ 6 हजार दिव्यांगांनी नोंदणी केली होती. दिव्यांगांमध्ये जनजागृती करुन त्यांची या ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी विविध दिव्यांग स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा व्हाट्स ॲप ग्रूप बनवून दिव्यांगांपर्यंत पोहचण्याचा निवडणूक विभागाचा प्रयत्न सुरु आहे.

  विविध मतदान केंद्रामध्ये रेलिंग लावणे, कर्णबधिरांसाठी सांकेतिक भाषा, माहितीपत्रके, सुविधादर्शक चिन्हे, रॅम्प लावणे, ब्रेल लिपी यासारख्या सुविधा दिव्यांगांना उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष भर देणार आहे. दिव्यांग बांधवांचा विधानसभा निवडणुकीत सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

  मतदानाच्यावेळी दिव्यांग मतदारांपुढील समस्या आणि त्यांना द्यावयाच्या सुविधा या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. दिव्यांगांना मतदान केंद्रावर काही अडचणी आल्यास ‘दिव्यांग मित्र’ म्हणून दिव्यांगांचे शिक्षक त्यांना मदत करतील. मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी दिव्यांग मतदाराबाबत संवेदनशिलतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी दिल्यात.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145