Published On : Sun, Apr 26th, 2020

अक्षयतृतीया अन्‌ ‘दीनदयाल’ची ‘मिष्ठान्न’ थाळी

Advertisement

शेकडो स्वयंसेवक पुरवित आहे दररोज साडे पाच हजार फूड पॅकेट्‌स

नागपूर, : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गरजू आणि गरीब लोकांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहे. यात गेल्या अडीच वर्षांपासून मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी केवळ १० रुपयांत ‘दीनदयाळ थाळी’ देणाऱ्या युवा झेप प्रतिष्ठानने गरिबांच्या सेवेचा मेरू लॉकडाऊनमध्येही पुढे नेला आहे. सुमारे साडे पाच हजार गरजूंना या काळात मोफत अन्न पुरविणाऱ्या युवा झेप प्रतिष्ठानने आज अक्षयतृतीयेचे निमित्त साधून मिष्ठान्न भोजन दिले.

नागपुरात सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेक कामगार, मजूर, भिक्षुक, रोजंदारी कामगार महासंकटात अडकले. शासनासोबतच अनेक मदतीचे हात त्यांची गरज ओळखून त्यांच्याकडे वळू लागले.

यात ‘दीनदयाल थाळी’ कशी मागे राहणार…? मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी केवळ १० रुपयांत स्वादिष्ट भोजन थाळी देण्याचा गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेला यज्ञ आजही अविरत सुरू आहे. कोव्हिड-१९च्या संकटात या नियमित थाळीसोबतच शहरातील गोरगरिबांना मोफत अन्न पुरविण्याचा संकल्प युवा झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महापौर संदीप जोशी यांनी केला आणि दररोज सुमारे साडे पाच हजार व्यक्तींना त्याचा लाभ मिळू लागला. सेवेचे माध्यम एक असले तरी या सेवाकार्यात हजारो हात कार्यरत आहे.

कार्यकर्त्यांची एक फळी भुकेल्यांना अन्न पुरविण्यात मग्न आहे. हे अन्न साधेसुधे नाही तर पौष्टिक अन्न आहे. या थाळीची चवच न्यारी आहे. आज अक्षयतृतीया. या अक्षयतृतीयेच्या पर्वावर ज्या गरजूंपर्यंत दीनदयाळ थाळी जाते, त्या गरजूंनाही मिष्ठान्न मिळावे, हा विचारही येथील स्वयंसेवकांनी केला आणि अक्षयतृतीयेच्या पर्वावर वितरीत करण्यात आलेल्या थाळीत मूंग हलवा अर्थात गोड शिरा गेला. या थाळीची चव चाखणाऱ्या प्रत्येकाने आज तृप्तीची ढेकर दिली.